पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१ लें.]
विषयप्रवेश

श्रमांचा उपयोग व्हावयाचा नाहीं; व त्यांचे श्रम वाचणार नाहींत. याच हेतूने मिळालेले महत्वाचे भाग पुढे छापविण्याचा विचार आहे. प्रयोग करून पाहण्यास तरी प्रथम त्या विषयावरचे वाङ्मय उत्तम कळावे लागते.
 ३ भारतीय रसायनशास्त्रीय ग्रंथांमध्ये दोन प्रकार आहेत. एक, फक्त रसायनशास्त्राचे व धातुवादाचे; व दुसरे रसवैद्यकाचे ह्मणजे वैद्यकीचे कामीं रसादिकांचा उपयोग केलेले; पहिल्या प्रकारचे ग्रंथच आज अत्यंत दुर्मिळ झालेले आहेत. दुसऱ्या प्रकारचे ग्रंथ बरेच आहेत. शुद्ध रसायनशास्त्राचे ग्रंथ अद्यापि फार थोडे मिळालेले आहेत. पुढे दिलेल्या माहितीचा असे ग्रंथ शोधून काढण्याचे कामींही उपयोग होईल. तसा उपयोग व्हावा ह्मणूनच ही सर्व माहिती प्रसिद्ध करीत आहों.
 ४ हेंच वाङ्मय वाचीत असतां धातुवाद खरा आहे हें प्रयोग सिद्ध करून दाखविणाऱ्या एका बैराग्याचीही गांठ पडली! त्यामुळे प्राचीन रसायनशास्त्राचें महत्व कळून आले व ते खरे असले पाहिजेत अशी खात्री झाली; आह्मीं काय पाहिलें हैं पुढे लिहिलेलेच आहे.

------------------
प्रकरण २ रे
रसशास्त्रांची उत्पत्ति
___________

 भरतवर्षांत रसशास्त्राचा उगम वैद्यकांत झाला. मनुष्यप्राण्यांचे नानारोगांनी जे हाल होतात ते शमविण्यासाठी प्राचीनकाळच्या नाना ऋषींनीं व लोकांनीं नाना मार्ग शोधून काढण्याच्या कामीं खटपट केली. कोणीं वनस्पतींच्यायोगे रोग बरे करण्याचा मार्ग काढिला, त्यांस मूलिकावैद्य ह्मणू लागले; भारद्वाज ( आत्रेय ), चरकादि मंडळी या वर्गातील होत. कोणीं शस्त्रविद्येने रोग बरे करीत, त्यांस शस्त्रवैद्य ह्मणत; धन्वंतरी, अश्विनीकुमार, सुश्रुतादि मंडळी या वर्गांतील होत. कोणीं पारा, इतर धातु, रसें व उपरसें यांच्या शुद्धीकरणाने व भस्मीकरणानें रोग बरे करू लागले, त्यांस रसवैद्य ह्मणत; अनेक प्राचीन 'रससिद्ध' या वर्गातील होत. हे सारे बहुधा तांत्रिक