पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१००
भारतीय लोकसत्ता

वर्गाला किंवा दहशतवादी क्रांतिकारकांना चिथावणी दिली नाहीं. त्या शक्तींना आवाहन केलें नाहीं. जनशक्ति जागृत नसतांना सैन्य है सामर्थ्य आहे, असे टिळकांच्या स्वप्नांतसुद्धां कधीं आलें नाहीं. 'आमचें लोकमत दुर्बल आहे, सरकारवर पगडा बसविण्याइतकें सामर्थ्य त्याच्यांत नाहीं. तेव्हां तें लोकमत जागृत केले पाहिजे' हा टिळकांचा महामंत्र होता. (केसरी २७|८|१९०१) यानंतरच्या काळांतहि सरकार ज्या ज्या वेळीं अत्यंत जुलमाचें व दडपशाहीचें कृत्य करी त्या त्या वेळी टिळकांनीं याच शक्तीला आवाहन केलेले आहे. बंगालच्या फाळणीच्या वेळी त्यांनीं याच शक्तीला उधान आणून तिला संघटित करण्याचा प्रयत्न केला. 'सरकार लाखों लोकांच्या मताला काडीइतकीहि किंमत देत नाहीं. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा कांहीं मार्ग आम्हीं काढला नाहीं तर लोकांचा चळवळीवरचा विश्वास उडून जाईल. तेव्हां हें लोकमत जागृत करणे, हें पुढाऱ्यांचे काम आहे. हल्लींचें लोकमत अळणी आहे. त्याचा हा अळणीपणा कसा घालवावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.' 'लोकमताचा प्रवाह समुद्रास मिळविण्याची खटपट आम्हीं केली नाहीं तर आमचा देशाभिमान व वक्तृत्व सर्व व्यर्थ होय.' असें व या तऱ्हेचे प्रतिपादन केसरींत त्यांनीं सारखें चालू ठेविलें होतें. (केसरी १५-८-१९०५)
 स्वातंत्र्यप्राप्ति किंवा राष्ट्रीयसंघटना यासाठीं उपरिनिर्दिष्ट काळांत जगांत जे देश प्रयत्न करीत होते, त्यांपैकीं एकाहि देशांतील नेत्याने, ब्रिटनचे उदाहरण डोळ्यांसमोर असूनहि, आपल्या देशांतील खऱ्या सामर्थ्याचा ठाव घेतला नाहीं, खऱ्या शक्तीला जागृत करण्याची आस धरली नाहीं. सर्व बळांत श्रेष्ठ असें जें जनताबळ त्याची उपासना त्यांनी कोणी केली नाहीं. जगांत सर्वत्र असा अंधेर असतांना हिंदुस्थानची स्थिति तरी काय होती ? प्रारंभीच्या लेखांत सांगितलेच आहे कीं, येथे आधीं लोकायत्त शासनाच्या परंपरा निर्माणच झाल्या नव्हत्या आणि कधींकाळीं झाल्या असल्या तर त्या निपटून नाहींशा झाल्या होत्या. ब्रिटिशांचा अंमल येथे स्थिरावल्यानंतर येथे स्वातंत्र्यप्राप्तीचा एक मोठा प्रयत्न झाला आणि तो म्हणजे १८५७ सालचा. तो सर्व प्रयत्न पूर्णपणें जुन्या पठडीतला, जुन्या चाकोरींतला होता. सरदार, संस्थानिक, जमीनदार हेच त्याचे प्रणेते होते. जनता त्यांत असली तर ती