पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१०७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०६
भारतीय लोकसत्ता

कशांतहि नाहीं. शिकलेले लोक समाजाचे व समाजांतलेच आहेत. समाज तरला तरच ते तरतील, समाजाला सोडून त्यांचे काडीचहि चालावयाचे नाहीं,' असे त्यांनीं नवशिक्षितांना बजावून सांगितले आहे. (केसरी ८-९-९६). १८९६ सालच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापूर्वी त्यांनीं राष्ट्रसभेला एक नवा संदेश दिला. 'अकरावी राष्ट्रीय सभा' या लेखांत (७-१-९६) ते म्हणतात, 'राष्ट्रीय सभेस पुढील दहा वर्षात जे वळण द्यावयाचे ते अशा धोरणानें दिले पाहिजे कीं, ज्यामुळे सभेस शेतकरी, कारागीर वगैरे लोकांचे साह्य मिळून तिचे ठराव अमलांत येण्यास ते मदत करतील.' हिंदी राष्ट्र व शेतकरी आणि कामकरी यांच्यांतील हाच अभेद, हेंच अद्वैत त्यांनी १४-१-१९०२ च्या लेखांत मांडले आहे. 'हिंदुस्थानची खरी स्थिति पहावयाची असेल तर शहरे पाहून उपयोग नाहीं. खेड्यांतील शेतकऱ्यांची किंवा मजुरांची स्थिति पाहिली पाहिजे.' असा विचार त्यांनी मांडला आहे आणि या जनतेची सेवा करणे हेंच आपले जीवितकार्य होय अशी निःसंदिग्ध शब्दांत त्यांनी घोषणा केली आहे. 'हिंदुस्थान ही आमची मातृभूमि आणि देवता, हिंदुस्थानवासी हेंच आमचे बंधुत्वाचें नातें व त्यांची राजकीय व सामाजिक स्थिति सुधारण्याचा एकनिष्ठपणें प्रयत्न करणे हाच आमचा धर्म.' (केसरीतील लेख, खंड १ ला पृ. २५९)
 लोकसत्ता, लोकांचे राज्य, लोकांचें सुख या शब्दांतील 'लोक' या पदाची टिळकांच्या मनांत कोणची व्याप्ति होती हें यावरून कळेल. त्यांच्या मनांत कांहीं अन्यथा भाव असता, सरदार, जमीनदार, संस्थानिक यांचे ते पक्षपाती असते तर त्यांनीं त्यांची संघटना करण्याचे प्रयत्न केले असते. ज्याला मिरासदारी प्रिय व लोकसत्ता अप्रिय असते त्याची मुख्य चिंता ही असते कीं, कष्टजीवी जनता जागृत होऊं नये, शहाणी होऊं नये, तिला आपल्या हक्कांची जाणीव होऊं नये. आणि या जनतेला जागृत करण्यासाठी तर टिळकांनी आपले सर्वस्व वेचलें, हे पुढे दिलेल्या इतिहासावरून सहज दिसून येईल. आतां सावकार, जमीनदार, संस्थानिक या वर्गाशी त्यांनी वैर धरले नाहीं, किंवा त्यांच्यावर अन्याय होईल तेव्हां त्यांची कड घेऊन त्यांनीं लिहिले हे खरेंच आहे; पण यांत वावगे काय आहे ? चीनमधील माओ-