पान:भारतीय लोकसत्ता.pdf/११९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
११८
भारतीय लोकसत्ता

होतें. १९०७ साली कलकत्याला 'टेनेट्स् ऑफ दि न्यू पार्टी' नव्या राष्ट्रीय पक्षाचें तत्त्वज्ञान, या विषयांवर व्याख्यान देतांना त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत हें बहिष्कारयोगाचे तत्त्वज्ञान समजावून दिलेले आहे.
 साधारणतः १९०५ सालापासून टिळकांनीं हें कायदेभंगाचें, निःशस्त्र प्रतिकाराचे किंवा या सर्वांचा समावेश करणाऱ्या बहिष्कारयोगाचे तत्त्वज्ञान लोकांत प्रसृत करण्यास प्रारंभ केला. त्याच्या आधीं कायद्याच्या कक्षेत राहून लढा करावा असे त्यांचे धोरण व आचरणहि असे. पण असें जरी असले तरी भारतीय स्वातंत्र्याचा लढा कायदेभंगाच्या या पद्धतीनेंच करावयाचा अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनांत १८८१ सालापासूनच घोळत असले पाहिजेत. केसरीच्या पहिल्या वर्षाच्या सातव्या अंकांतच 'बहिष्कार' हा लेख आला आहे. त्यांत ते म्हणतात, "राजकीय शिक्षा ही लोकमतावरच अवलंबून असते. आपण जर उद्यां तुरुंगांत जाणे ही शिक्षा असें मानले नाहीं तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार ? लोक आनंदाने तुरुंगांत जातील. याचा प्रत्यय घेण्यास फार लांब जावयास नको. गेल्या दुष्काळांत तुरुंगांत जाणे ही शिक्षा आहे असे कितीकांस वाटले?" १९०७ सालच्या भाषणांत बहिष्काराचा जो व्यापक अर्थ सांगितला आहे तो यांत नाहीं. पण सरकारशी लढण्याचे हें एक शस्त्र आहे, हा भावार्थ त्यांत स्पष्ट आहे. याच निबंधांत पुढे म्हटले आहे कीं, 'आयर्लंडांत लँडलीग म्हणून जी सभा आहे त्या सभेनें पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केले आहे. तर अशाच तऱ्हेने जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचे रूपांतर होईल तर त्यापासून पुष्कळच फायदा होईल' या एकंदर निबंधांतील 'बहिष्काराचें' रूप कांहिंसे अस्पष्ट असले तरी राजशक्तीपेक्षां लोकशक्ती ही जास्त प्रभावी असते व लोकांनीं राजशक्ति मानली नाहीं तर ती तत्काळ निस्तेज होते, हा विचार मात्र निःसंदिग्ध शब्दांत मांडलेला दिसतो. आणि हा विचारच पुढील सर्व 'बहिष्कार योगाच्या' तत्त्वज्ञानाचा पाया आहे.

कायदेभंग

 प्रत्यक्ष कायदेभंगाच्या प्रचारास टिळकांनी १९०५ साली बंगालच्या फाळणीच्या प्रसंगानें सुरवात केली असली तरी त्याच्या आधीं दोनतीन