पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२८

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२७
भारतीय लोकसत्तेचा आद्यप्रणेता

तत्त्वज्ञान सांगून व त्यासाठी स्वतः झिजत राहून व अनेक संग्राम करून तिच्या ठायीं आत्मप्रत्यय निर्माण केला आणि स्वातंत्र्य व लोकसत्ता यासाठी जो महासंग्राम पुढे व्हावयाचा त्यासाठी तिला सिद्ध केले.
 लोकसत्ता ही मानवी समाजाची अत्यंत परिणत अशी अवस्था आहे. ती प्राप्त होण्यासाठीं त्या समाजांतील मानव हा आमूलाग्र निराळा होणे, त्याच्या मनाची घडण सर्वथैव बदलणे अवश्य असतें. जेथे लोकसत्तेचा उदय झालेला नसतो तेथे मानव हा व्यक्ति या पदवीला प्राप्त झालेला नसतो. पूर्वीच्या काळांत त्या त्या भूप्रदेशांत मानवांचे समूह असत. धुळीच्या राशींतील कणांना ज्याप्रमाणे भिन्नपणा नसतो, पृथगहंकार नसतो त्याप्रमाणे या मानवानांहि नसतो. पशूंचे जसे कळप तसेच मानवांचे हे समूह किंवा कळपच होत. त्या काळी भिन्नत्व नसते एवढेच नव्हे तर कोणा मानवाच्या ठायीं असे भिन्नत्व निर्माण झाले तर ते नष्ट करून टाकावें असेंच समाजाचें धोरण असतें. जातीचे जे सामान्य धर्म त्यांशीं जातीचा प्रत्येक घटक अनुगामी असलाच पाहिजे असा समाजाचा कटाक्ष असे. आणि या बंधनांमुळेच मानवाचे कर्तृत्व कुंठित होत असें. पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या भूमीत प्रवेश होण्यापूर्वी हजार दीड हजार वर्षे येथला समाज अशा स्थितीत होता. येथे मानवाचें समूह होते. येथे जाति होत्या. पण त्या जातींतून व्यक्ति निर्माण होत नव्हत्या. निर्माण होऊंच नयेत अशी समाजरचना येथे होती. अशीं धर्मबंधने येथें होतीं.

राजकीय म्हणजेच सामाजिक व आर्थिक

 अशा या समाजांतून व्यक्ति निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या शतकांतील थोर पुरुषांनीं कसा केला तें आपण येथवर पाहिलें, राजा राममोहन, माधवराव रानडे यांनी येथल्या मानवाला त्याच्या आत्मप्रतिष्ठेची जाणीव करून दिली. गलिच्छ अशा जड आचारधर्माच्या बंधनांतून त्याला मुक्त करून आपण मानव म्हणजे देह नसून कांहीं वरच्या शक्तीहि आपणापाशीं आहेत, याची संज्ञा त्याला आणून दिली. जो धर्म मानवाच्या देहालाच महत्त्व देतो तो समाजाला कळपाचीच अवस्था प्राप्त करून देतो. त्या काळचा हिंदुधर्म या स्वरूपाचा होता. तो उच्छिन्न करून या धर्मवेत्त्यांनी