पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१२९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२८
भारतीय लोकसत्ता

तेथें मनाला महत्त्व देणारा धर्म प्रस्थापित केला. पण या धर्माची बंधनेहि गूढ अध्यात्माच्या वर्चस्वामुळे मानवी मनाला व बुद्धीला म्हणजेच त्याच्या व्यक्तित्वाला जाचक होतात हे जाणून आगरकरांनी त्या बंधनांवरहि घाव घातले आणि शुद्ध भौतिकवादाचा संदेश सांगून भारतीयांचे मन अगदी निर्मुक्त करून टाकले. या पुढची महनीय कामगिरी टिळकांनीं केली. धार्मिक व सामाजिक बंधनापेक्षां राजकीय बंधने शतपटीनें, सहस्रपटीने जाचक असतात. मग ती बंधने स्वकीयांनी लादलेलीं असोत वा परकीयांनी ! मानवाच्या मानवत्वाचा, प्रतिष्ठेचा, व व्यक्तित्वाचा राजकीय पारतंत्र्याच्या शृंखलांनीं सर्वस्वी कोंडमारा होत असतो. अशा या अत्यंत घातक शृंखलांवर टिळकांनी घण घालण्यास सुरवात केली, आणि हे घण घालण्याचे शिक्षण जनतेला दिले. सरदार, जमीनदार, संस्थानिक यांच्या साह्याने या शृंखला तोडून त्यांनी स्वातंत्र्य आणले असते तरी जनतेचे राजकीय पारतंत्र्य तसेंच राहून तिच्या व्यक्तित्वाचा विकास झाला नसता. पण टिळकांनी लोकशक्ति जागृत केली. आणि सामाजिक सुधारणांच्या आधी राजकीय सुधारणा अवश्य आहेत, राजकीय सुधारणा येतांच सामाजिक सुधारणा आपोआप येतील असे ते जे म्हणत त्यांतील मर्म यांत आहे. सामान्य जनता, शेतकरी व कामकरी जनता, बहुसंख्य जनता अन्यायाच्या प्रतिकारार्थ एकदां सिद्ध झाली, जुलमाविरुद्ध प्रतिकार करण्याची रंग तिच्याठायी निर्माण झाली, प्रबळ अशा पाशवी सत्तेशीं संग्राम करून तिला आपण खडे चारूं शकतो, असा आत्मविश्वास तिच्याठायी निर्माण झाला म्हणजे जनतेच्या व्यक्तित्वाचा संपूर्ण विकास होतो; आणि अशी ही जनता मग कसलीहि विषमता, कसलीहि सामाजिक वा धार्मिक अन्याय्य बंधने टिकूं देणार नाहीं हें उघडच आहे. आगरकरप्रणीत सामाजिक सुधारणेला टिळकांनी अनेक केळां विरोध केला एवढ्यावरून कांहीं अडाणी लोक त्यांना प्रतिगामी म्हणतात. हिंदुधर्मातली जुनी विषमता, कनिष्ठवर्णीयांची जुनीं दास्ये त्यांना तशींच टिकवून ठेवावयाचीं होती असें या लोकांना वाटते. ज्याला जनता दास्यांत ठेवावयाची आहे तो तिच्या ठायींची सुप्त शक्ति कधींहि जागृत करणार नाहीं. अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति तिच्यांत निर्माण करणार नाहीं. कारण ती एकदां निर्माण झाल्यानंतर कोणचीहि