पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१३

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
भारतीय लोकसत्ता

 अल्पक्षेत्र मर्यादेप्रमाणेच आपसांतील कलह, भेद, फुटीरपणा हें या प्रजातंत्रांच्या विनाशाचें दुसरें कारण होय. या प्रजासत्ताकांच्या मर्यादा लहान होत्या, तरी त्यांच्यांत भेदप्रवृत्ती नसत्या तर त्यांचा इतका समूळ नाश झाला नसता; पण ही गोष्ट फार अवघड आहे. हे संघ त्या काळांत इतक्या दीर्घकालपर्यंत म्हणजे हजारबाराशे वर्षेपर्यंत टिकूं शकले, हेंच आश्चर्य आहे. सर्वांचीच आयुर्मर्यादा इतकी होती असे नव्हे; पण इतक्या कालावधी- पर्यंत भिन्नभिन्न ठिकाणी का होईना लोकायत्त शासनाचे तत्त्व पुनःपुन्हां उदयास येऊन टिकून राहू शकले, हीहि उपेक्षणीय गोष्ट नाहीं. कारण राजसत्तेत ऐक्य व संघटना टिकविणे जसें सुलभ असतें तसें लोकसत्तेत नसतें. स्वातंत्र्य व संघटना यांचा समन्वय घालणे हें कर्म महाकठिण आहे. ग्रीस, रोम येथील प्रजासत्ताके या भेदनामक रोगानेच मृत्यू पावलीं. सध्यां मेक्सिको, ब्राझील, चिली येथील लोकसत्ता याच रोगाने जर्जर झाल्या आहेत. फ्रान्स हा त्यामुळेच कायमचा पंगु झाला आहे आणि इटली, जर्मनी, पोलंड येथे लोकसत्ता क्षणभरहि तगूं शकत नाहीं, याचे कारणहि तेच होय. दण्डसत्तेवांचून, अनियंत्रित सत्तेवांचून संघटना टिकविणे हे जगांतल्या बहुतेक लोकांना जमत नाहीं. ब्रिटन, अमेरिका हे देश सोडले तर अजून कोणाला जमलेले नाहीं. 'भेदमूलो विनाशो हि गणानामुपलक्षये' 'लोकराज्यांचे मरण त्यांच्यांतील यादवीत आहे' असा महाभारतकारांनी सिद्धान्तच सांगितला आहे. 'या आपसांतील कलहामुळे मी वैतागून गेलो आहे' असे श्रीकृष्णाने देवर्षि नारदांना सांगून अंधक वृष्णींचे राज्य कसे सांभाळावे, याविषयीं त्यांचा सल्ला विचारला, ही महाभारतांत (शांति ८१) दिलेली हकीकत फार उद्बोधक आहे. 'विवेक, संयम, परमतसहिष्णुता, वाक्चातुर्य हे गुण यासाठीं अवश्य असून त्यांचा उपयोग करून तूं या अंधकवृष्णींच्या संघाचा संभाळ कर; भेदामुळेच संघाचा विनाश होत असतो, तूं या संघाचा प्रमुख असल्यामुळे त्याचा उत्कर्ष तुझ्यावर अवलंबून आहे; तेव्हां औदार्य, सहिष्णुता हीं दाखवून तूं त्यांचा विनाश टाळला पाहिजेस,' असा नारदांनीं श्रीकृष्णाला सल्ला दिला आहे. सभासदांचे मतैक्य हेंच गणराज्याचे खरें बळ, हे गौतम- बुद्धाच्या मागें दिलेल्या उद्गारांतहि अभिप्रेत आहे, असे दिसून येईल.