पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४८
भारतीय लोकसत्ता

जप्ती, लाठी हीं आपली सर्व पाशवी शर्ते वापरली; पण शेतकऱ्यांनी धीरानें, चिकाटीने व शांततेनें तें सर्व सोसले. सर्व भरतखंडावर या प्रतिकाराच्या नादलहरी उमटू लागल्या. तेव्हां सरकारने नमते घेतले. बार्डोली- पेक्षांहि सायमन कमिशनवरील बहिष्कारांने उद्भवलेला लढा प्रक्षोभक व व्यापक स्वरूपाचा होता. मद्रास, लखनौ, पाटणा, लाहोर येथे कायदा तोडून पन्नास पन्नास हजारांच्या मिरवणुकी निघाल्या व लाठीमार, घोडदौड, गोळीबार यालाहि दाद न देतां लोकांनीं आपला निषेध जगापुढे मांडला. लाहोरच्या या मिरवणुकींतच लालाजींना लाठीचा मार बसला व तो प्राणघातक ठरला. आणि सरदार भगतसिंग यांनी असेंब्लींत फेकलेला बाँब आणि त्यानंतरचा सॉंडरस् च्या खुनाचा खटला हीं प्रकरणे त्यांतूनच उद्भवून त्यांनीं बहिष्कारानें निर्माण केलेल्या प्रक्षोभांत प्रत्यक्ष ठिणगीच टाकली. लाहोरच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाच्या रूपाने त्या प्रक्षोभांतून निवालेली ज्योत भरतभूमीला स्पष्ट दिसूं लागली व राष्ट्र पुन्हां संग्रामाला सिद्ध झालें. त्याला घेऊन महात्माजी दांडीकडे निघाले.

जनशक्ति

 भारतीय जनतेत निर्माण झालेल्या लढाऊवृत्तीचा खरा आविष्कार १९३० सालच्या संग्रामांतच प्रथम प्रतीतीस आला. मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, या देशाचे खरे स्वामी म्हणजे येथले जे बहुसंख्य कष्टकरी लोक, त्यांनी परकीय आक्रमकाविरुद्ध उभे रहावें, यांतच लोकशाहीची खरी प्राणप्रतिष्ठा आहे हा विचार टिळकांनी १८८० सालींच निश्चित केला होता व प्रारंभापासून चळवळीचे तसे धोरणहि त्यांनी आंखले होते. आतां कष्टकरी जनता लढ्यास उभी राहिलेली पहाण्याचे भाग्य त्यांना जिवंतपणी लाभले नाहीं. पण महात्माजींनीं त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला ते मिळवून दिले. ३० सालचा संग्राम सार्थ नामाने जनतेचा संग्राम होता. या भारती राष्ट्राला आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचे स्वतःलाच एवढे भव्य दर्शन कधींहि घडलें नव्हते, अखिल भरतभूमि हें एक राष्ट्र आहे, याचा असा प्रत्यय इतिहासांत कधीं आला नव्हता, तो या वेळीं आला.