पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१५४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५३
जनताजागृति

जरी सत्याग्रहाच्या उच्च व उदात्त पातळीवरून केले असले तरी वस्तुतः ते निःशस्त्र प्रतिकारच होते. निःशस्त्र प्रतिकार म्हणजेच मागच्या प्रकरणांत सांगितलेला टिळकांचा बहिष्कारयोग होय. गांधीजीवनरहस्यांत आचार्य जावडेकरांनी हे स्पष्ट केले आहे. 'जनतेला व कार्यकर्त्यांनाहि सत्याग्रहाची खरी वृत्ति अद्यापि समजलेली नाहीं' हे गांधीजींचे १९३४ सालचे मत दोनतीनदां उधृत करून त्यांनी स्वतःचे म्हणून असे मत दिले आहे कीं, 'राष्ट्रसभेचे लढे व तिचीं साधनें हीं बहिष्कारयोगांतच बसूं शकतात. प्रतिपक्षाविषयीं प्रेम हे जे सत्याग्रहनिष्ठेचे लक्षण तें राष्ट्रसभेच्या मार्गास लावता येणार नाहीं.' (पृ. ४०५) 'अहिंसा ही आम्ही धोरण म्हणून स्वीकारली आहे,' हें पंडितजींनीं तर अनेकवेळां बोलून दाखविले आहे. गांधीजींचे उजवे हात राजगोपाळाचारी यांचा प्रथम सत्याग्रहावर विश्वास होता. पण पुढे तेहि अविश्वास दाखवूं लागले. तेव्हां भारतीयांनी ब्रिटिशांशीं जे लढे दिले ते सर्व सत्याग्रही लढे नसून निःशस्त्र प्रतिकार होते, हे आपण लक्षांत ठेवले पाहिजे आणि या दृष्टीनें आपण पाहूं लागलों तर नेताजींच्या लष्करी मोहिमेशीं त्यांचा कसा दृढ संबंध आहे ते आपणांस कळून येईल.
 निःशस्त्र प्रतिकार हा सशस्त्र प्रतिकाराची पूर्व तयारी म्हणूनच केला जातो. लोकजागृति हें त्याचे मुख्य उद्दिष्ट असते, आणि या लोकजागृतीतच लोकसत्तेचीं बीजें असतात. सत्याग्रहांत या लोकजागृतीचे महत्त्व नाहीं. त्यांत मानवाची आध्यात्मिक उंची वाढविणे हा हेतु असतो. आणि मुख्य म्हणजे त्यांत संख्येला महत्त्व नसते. आपणाला अगदीं अस्सल, बावनकशी, एकनिष्ठ असे सत्याग्रही हवे. मग ते कितीहि थोडें असले तरी चालतील, असे महात्माजींनी अनेक वेळां जाहीर केले आहे. 'जर आपली बाजू न्याय्य असेल व प्रतिकारसाधनें शुद्ध असतील तर एकटी एक एक व्यक्ति देखील सत्याग्रहलढा सुरू करून तो चालू ठेवू शकेल' असे रंगराव दिवाकरांनी म्हटले आहे. १९३४ सालापर्यंत महात्माजींनी सुरू केलेल्या लढ्याला १७/१८ वर्षे पुरी झाली होती. त्या अवधीत दोन प्रचंड संग्राम व अनेक लहानसहान झगडे होऊन गेले होते. तरी सत्याग्रहाचे खरें तत्त्व माझ्याखेरीज कोणालाच समजलें नाहीं, असें ३४ साली महात्माजींनी मत दिलें. लोकसत्तेला शुद्ध सत्याग्रहाचा मुळींच उपयोग कसा नाहीं हें यावरून