पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१७३

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७२
भारतीय लोकसत्ता

आपल्या चळवळीची योजना काय, तिचें भवितव्य काय याची गांधीजींनाच स्वच्छ कल्पना नव्हती, मग अनुयायांना कोठून असणार? गांधीजींचे चरित्रकार शिखरे म्हणतात की, 'बार्डोलीच्या प्रकरणानंतर हा जवळ जवळ नियमच झाला.' 'चळवळीची तपशीलवार योजना मजजवळ नाहीं' 'सारा अंधार आहे' 'प्रकाशाची वाट पहात आहे' असे उद्गार पुढील चळवळीच्या वेळी निघू लागले. ४२ चे आंदोलन ही या दृष्टीने पाहतां एक दुःखद कहाणीच म्हटली पाहिजे, एवढ्या मोठ्या या संग्रामाची कसलीहि पूर्वयोजना नव्हती. १४ जुलै १९४२ चा ठराव व त्यावर मोर्तब करणारा ८ ऑगस्टचा ठराव यांत 'व्यापक प्रमाणावर देशभर सामुदायिक संग्राम करावा, महात्माजींच्या आज्ञा पाळाव्या' एवढाच संदेश आहे. संग्रामाच्या स्वरूपाची, योजनेची, भवितव्याची कांही एक कल्पना त्यांत नाहीं. ८ ऑगस्टनंतर गांधीजी सरकारशीं बोलणी करणार होते व ती अयशस्वी झाल्यानंतर संग्राम पुकारणार होते, हे जरी खरे असले तरी, सरकार आपणावर एकदम झडप घालणार आहे, हे गांधीजींना व सर्वांनाच आधीं माहीत होतें. (पट्टाभि, काँग्रेस इतिहास, २ रा खंड. पृ. ३६५) आणि याची तरी काय गरज होती. एवढ्या मोठ्या अखिल भारतीय संग्रामाची योजना व पूर्वतयारी ही काय आठचार दिवसांत होणार होती काय ? तिला वर्ष दोन वर्षे सहज लागली असती. आतां अशी दीर्घकालीन तयारी गांधीजी करीत होते. नाहीं असें नाहीं. पण ती पूर्वतयारी आध्यात्मिक होती. गूढ व अतींद्रिय होती. तिचा व संग्रामांतील यशापयाशाचा संबंध काय हे कोणालाहि कळणे शक्य नव्हते. १९३९ सालापासूनच 'लढा सुरुं करावा' असें अनेकांचे म्हणणे होतें. सुभाषचंद्रांचा तर तो आग्रहच होता. गांधीजींचे उत्तर एक. राष्ट्र तयार नाहीं. त्याची पूर्वतयारी केली पाहिजे. ती कोणती ? तर चरखा, खादी, विधायक कार्यक्रम ! प्रत्येक काँग्रेसहौस हे चरखाकेंद्र झाले पाहिजे. प्रत्येक भावी सत्याग्रहीनें रोज सूत कांतले पाहिजे, रोज इरिजन वस्तीत गेले पाहिजे, प्रेमभाव वाढविला पाहिजे वगैरे. संग्राम होणार होता तो कायदेभंगाचा, करबंदीचा. पण त्याच्या योजना, त्याची प्रांतवार आंखणी, त्या काळांतील शेतकऱ्यांच्या उपजीविकेची व्यवस्था, या संबंध एक अक्षरहि रामगडच्या त्यांच्या भाषणांत नाहीं. म्हणजे ही तयारी