पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९७
गांधीवाद व लोकसत्ता

पण ही सर्व आपत्ति सध्यांच्या विस्कळित समाजांत यंत्र आल्यामुळे आलेली आहे. नव्या समाजाला जुन्यापेक्षां सहस्रपटीनें जास्त धन लागणार आहे हें ध्यानांत घेतले आणि तो समाज योजनाबद्ध होणार आहे हे गृहीत धरलें, तर चेकारीचा विचार कोणाच्या स्वप्नांतहि येणार नाहीं. किमान गरजा भागवितांनाच समाजांत सर्वांना पुरेसें काम मिळेल. मग गरजा वाढविण्याचें समाजवादाचें तत्त्व अंगीकारल्यानंतर तर बेकारीचा प्रश्नच उरणार नाहीं. भांडवलदारी समाजव्यवस्थेत उत्पादन हें नफ्यासाठी करण्याचे धोरण असें. त्यामुळे बेकारीची आपत्ति अटळ होती; पण समाजवादी व्यवस्थेत जे धन उत्पन्न होणार ते समाजाच्या भोगवट्यासाठींच होणार असल्यामुळे त्यांत मर्यादेचा प्रश्नच येणार नाहीं. सर्वांना कामधंदा पुरवितांना उत्पादन जास्त झालें, तर ती आपत्ति नसून ती संपत्ति ठरेल, कारण न्याय्य विभजन होणार असल्यामुळे प्रत्येकाच्या वांट्याला जास्त सुखसाधनें येतील. तेव्हां आजची विस्कळित बेबंद समाजव्यवस्था जमेस धरून समाजवादावर आक्षेप घेण्यांत अर्थ नाहीं. ती गृहीत धरली तर ग्रामवाद तरी बेकारी कशी घालविणार आहे? मागें सोलापूरच्या परिषदेत विणकरांच्या उत्पन्नाचा जो हिशेब प्रा. रंगा यांनी दिला तो अगदींच निराशाजनक आहे. हातमाग चालविले तर कापडाच्या एक तृतीयांश व्यवसायांत दोन कोटी लोक पोट भरतात. तेच गिरण्या चालविल्या तर दोन तृतीयांश व्यवसायांत वीस लक्षांनाच काम मिळते असा मोठा उदार हिशेब त्यांनी सांगितला. पण त्या दोन कोटींचें उत्पन्न किती? हे दोन कोटी लोक १६० कोटी वार कापड तयार करतात. म्हणजे प्रत्येक वर्षाला ८० वार कापडाची निर्मिति. एक रुपया वार कापड धरले तर वर्षाला प्रत्येकी उत्पन्न ८० रु. म्हणजे महिना साडेसहा रुपये ! आणि हे उत्पन्न जमेला धरून याच्या आधारे ग्रामवादी लोक निर्मितीचा आनंद, मानवाचें व्यक्तित्व, त्याचे स्वातंत्र्य, ती ग्रामीण स्वच्छंदता व निरागसता यांवर भाषणे करतात !

ग्रामवादाचा ठिसूळ पाया

 पण ग्रामवादाने आपल्या देशावर जी सर्वात मोठी आपत्ति येणार आहे, ती निराळीच आहे. ग्रामवादांत निवृत्ति, वैराग्य व अल्पसंतुष्टता