पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२५
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

ऑफ इंडिया या पुस्तकांत त्यांच्या इंग्रज चरित्रकाराने केला आहे. 'हा पुण्याचा सनातन ब्राह्मण आपल्यांत येऊन बरोबरीनें मिसळतो, या विचारानें कामगारांना अस्मान् ठेंगणे झालें' असें त्याने म्हटले आहे. मात्र याला अन्यत्र कोठेंहि पुरावा मिळत नाहीं. पण १९०२ सालचे केसरीतील 'हिंदुस्थानचे दारिद्र्य', 'आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले ?' हे लेख पाहिले म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ आठदहा वर्षे केल्यानंतर जागृतीची तीच ठिणगी कामगारांत टाकून द्यावी या विचारानें टिळक प्रवृत्त झाले असतील हे पूर्ण संभवनीय आहे. पण तसे असले तरी ते प्रयत्न प्रत्यक्षांत अवतरले नाहीत हे खर आहे. तेव्हां १९२०-२१ पर्यंत कामगारांमध्ये राजकीय दृष्टीने चळवळ व संघटना झाली नव्हती; आणि कामाचे तास कमी करून घेणे, मजुरी वाढवून घेणे, इतर तक्रारी दूर करून घेणे इ. हेतूंसाठी ज्या संघटना झाल्या त्यांनाहि पहिले महायुद्ध संपून जाईपर्यंत विशेष जोर चढला नव्हता, असेच म्हटले पाहिज.

कम्युनिस्ट पक्षाची स्थापना

 १९१८ सालीं सोव्हिएट रशियांत अभूतपूर्व अशी क्रान्ति झाली आणि तेव्हांपासून एकंदर जगाच्याच कामगारवर्गाच्या जीवितांत नवे युग सुरूं झालें. रशियांत कामगारांचें राज्य स्थापन झाले व कामगारवर्ग सत्ताधीश झाला, असा त्यावेळी सर्वत्र बोलबाला झाला. त्यामुळे या वर्गांच्या जीवनांत नव्या आशाआकांक्षांचा उदय होऊन त्याची सर्व कळाच पालटून गेली. मार्क्सवादी वाड्मय हळूहळू भारतांत झिरपून येऊं लागले व मुंबईच्या कांहीं तरुण कार्यकर्त्यांच्या मनांत मार्क्सच्या अलौकिक संदेशाचे ध्वनि घुमूं लागले, १९२२ ते १९२४ च्या दरम्यान श्रीपाद अमृत डांगे, ठेंगडी, घाटे, जोगळेकर, शौकत उस्मानी, झाबवाला, मुझफर अहंमद, दासगुप्ता यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व डांगे यांच्या संपादकत्वाखाली १९२४ सालीं 'सोशालिस्ट' हे पत्र चालू केले.
 मार्क्सवाद ही एक प्रखर आग आहे. ती ज्या भूमीत पसरते, तेथील प्रस्थापित राजसत्ता, धर्मसत्ता, तेथील समाजांवर वर्चस्व गाजविणाऱ्या हजारों
 भा. लो.... १५