पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२
भारतीय लोकसत्ता

अनुकूल राहिली नाहीं आणि म्हणून ती प्रेरणा येथें प्रभावी होऊं शकली नाहीं.
 हे जे झाले ते भारताच्या हिताचे झालें कीं अहिताचें ? हा प्रश्न फार गहन आहे. कम्युनिस्टाशीं वाद चालू असतांना अनेक वेळां 'टिळकांनी मार्क्स वाचला होता काय?' असा प्रश्न विचारलेला मी ऐकला आहे. टिळकांनी बहुधा मार्क्सवादाचा अभ्यास केला नसावा असे मला वाटतें; पण टिळक मार्क्सवादी नव्हते हें या भूमचें भाग्य होय असे मी मानतो. कारण त्यामुळेच त्यांनी येथें विशुद्ध लोकशाहीची परंपरा निर्माण केली आणि एक अभूतपूर्व अशी क्रांति या देशांत घडवून आणली. महात्माजींनी तेंच व्रत पुढे चालविलें आणि या देशांत मार्क्सवादाचें आगमन दुष्कर करून टाकले. पण आज या लोकशाहीच्या भवितव्याविषयीं मनाला दारुण शंका येऊन मोठा संभ्रम निर्माण होतो. लोकशाही ही संयम, विवेक, त्याग, नीति या कठोर व्रतांची अपेक्षा बहुसंख्य लोकांकडून करीत असते आणि आज अत्यंत अल्पसंख्य लोक तरी या कसोटीस उतरतील की नाहीं याची शंका आहे; आणि हे जर सत्य असेल तर लोकसत्ता लांबच राहिली, आमचे राष्ट्रीय स्वातंत्र्य तरी टिकेल की नाहीं, अशी भीति मनांत उद्भवते. या भयानें मन व्याकुळ असतां त्या दुबळ्या अवस्थेत असा विचार येतो कीं, आम्हींहि मार्क्सवादाचा आश्रय केला असता तर बरें झालें असतें. लोकशाही नाहीं; पण निदान रशिया व चीन यांच्याप्रमाणे, कठोर दण्डसत्तांकित कां हेईना पण एक समर्थ व समृद्ध असें राष्ट्र तरी भरतभूमत निर्माण झाले असते. आज आमची लोकसत्ता अयशस्वी झाली आणि तो संभव फार आहे- तर येथे लोकशाही नाहीं व स्वातंत्र्यहि नाहीं अशी स्थिति होऊन बसेल आणि टिळक व महात्माजी या महाविभूतींची शिकवण पचविण्याची ताकद पुढील पिढ्यांना नव्हती म्हणून भरतभूमीचा नाश झाला, असा इतिहास निर्वाळा देईल. भावी इतिहासकारांचीं हीं वाक्यें मनःचक्षूंपुढे येऊन क्षणभर मनांत येतें कीं, मार्क्सवादाचा आश्रय करून निदान रशिया- चीनप्रमाणे एक बलिष्ठ समाज तरी आम्ही निर्मिला असता. अर्थात् हें सर्व निराशेच्या दुबळ्या मनःस्थितीत असतांना जागृत व सावध अवस्थेत असतांना, रशियाची