पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४
भारतीय लोकसत्ता

या जमाती प्रसिद्धच आहेत. अस्पृश्य, गुन्हेगार व आदिवासी मिळून नऊ दहा कोटी तरी लोकसंख्या होईल. एवढ्या लोकांना शतकानुशतकें मानवतेचे सामान्य हक्क सुद्धां नव्हते. आर्य म्हणविणाऱ्या व सर्व विश्व आर्य करून टाकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या हिंदु लोकांनी यांची फारशी पूसतपास कधीं केली नव्हती. ही जबाबदारी आपली आहे असे हिंदुसमाजानें कधी मानलेच नाहीं. सत्ता हातीं येतांच काँग्रेसनें या प्रचंड मानवसमूहाला नरकाच्या खोल गर्तेतून उचलून मानवतेच्या सन्मान्य भूमीवर आणून उभें केले. अशा तऱ्हेचे जगाच्या इतिहासांतले हे पहिलेच कृत्य असेल असे वाटते.

भारताची घटना

 राजकीय पुनर्घटनेच्या दृष्टीने काँग्रेसचे दुसरे महत्कृत्य म्हणजे भारताची घटना सिद्ध करून तिचा प्रत्यक्ष अंमल चालू करणे हे होय. या घटनेने भारताच्या इतिहासांत एका नव्या युगास प्रारंभ झाला आहे. सोळा लक्ष चौरस मैलांच्या खंडप्राय भूमीतील पस्तीस कोटी जनता धर्म, जाति, भाषा, लिंग इ. अनेक प्रकारच्या विषमता विसरून आतां समभूमीवर आली आणि तिने एक स्वयंशासन निर्माण करून आपण होऊन ती एकशासनाखाली नियंत्रित झाली. सर्व दृष्टींनी ही गोष्ट अभूतपूर्व अशी आहे. युगानुयुगें राजा, सरंजामदार, ब्राह्मण येथपासून जमीनदार, जहागीरदार, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्यापर्यंत प्रत्येकापुढे दीनपणे लाचारीनें वांकून त्यांच्या कृपाप्रसादाने जगण्यांत धन्यता मानणारी अशी ही प्रजा होती. आज काँग्रेसनें तिला व्यक्तिस्वातंत्र्य, भाषण- मुद्रण- संघटना- स्वातंत्र्य असे मूलभूत हक्क प्राप्त करून देऊन मानवत्वाचें उच्चतम भूषण प्राप्त करून दिले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे मानवाच्या सर्व उत्कर्षाचें साधन आहे. सर्व प्रकारचें वैभव प्राप्त करून देणारा हा चिंतामणि आहे. हा मणी भारतीय जनतेच्या हात देऊन काँग्रेसनें तिच्या जीवनांत आजपर्यंत कधींच अवतीर्ण न झालेले असे एक नवीन व उज्ज्वल युग प्रवर्तित केले आहे. त्यांतून पुढे कोणचें भवितव्य निर्माण होईल हा प्रश्न वादग्रस्त असला, तरी शतकानुशतकें चालत आलेले विषमतेचें,