पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९१
कृषिपुनर्घटना

चारण्याचे, लुटून नेण्याचे व इतरहि असे चोरी- दरवडे- लुटालुटीचे प्रकार सारखे घडू लागले आहेत. प्रत्येक गांवाने या प्रकारानें संघटित जीवन निर्माण केले तर त्यांतून धनधान्यसमृद्धि तर निर्माण होईलच; पण त्याचबरोबर इतकें सामर्थ्य निर्माण होईल कीं, चोरदरवडेखोरांचा बंदोबस्त होऊन पुढेमागें आपल्यावर परकीय आक्रमण आले तर त्यालाहि यशस्वीपणें तोंड देतां येईल, या दृष्टीने पहातां ही नव्या जीवनाची प्रेरणा किती महत्त्वाची आहे, हे ध्यानांत येईल.
 कोल्हापूरजवळच्या मिणचे गांवची हकीगत याच प्रकारची आहे. तेथील कार्यकर्त्यांनी आपल्या कर्तबगारीने गांवची संघटना करून तेथील जीवनाची समूळ पुनर्घटना केली आहे. तेच खेडुत, तेंच गांव, तीच साधनसामुग्री; पण योजनाबद्धतेचें, स्वावलंबनाचें देशभर जे वातावरण निर्माण होत आहे त्यांतून प्रेरणा मिळतांच गांवांत रस्ते झाले, शाळा उभी राहिली, शेती सुधारली, आणि गांवांत स्वच्छता, आरोग्य व समभाव नांदूं लागला. पुण्याचे सुप्रसिद्ध चित्रकार गोंधळेकर यांनीं कांहीं मित्रांच्या साह्याने 'नवा गांव' नांवाची संस्था स्थापन केली आहे. वाल्हे या गांव नुकतेंच त्यांनी तेथील वस्तूंचें एक प्रदर्शन भरविले. त्यामुळे गांवकऱ्यांच्या सहकारी वृत्तीला चालना मिळून आतां सहकारी पद्धतीनें गांवाजवळ बंधारा बांधण्याची जवळजवळ लाखदीडलाखाची योजना ते आंखीत आहेत. सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर गांवीं डॉ. मोडक यांच्या नेतृत्वाखालीं गांवकऱ्यांनी आज दहाबारा वर्षे सहकारी पद्धतीने श्रम करून रस्ते, देवालये, शाळा अशी जवळजवळ पन्नास हजार रुपयांची कामे केली आहेत.
 साने गुरुजी सेवापथकाने अशा प्रकारच्या कार्यास स्वत:ला वाहून घेतलें आहे. गेल्या तीनचार वर्षांत महाराष्ट्रांतील जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यांत पथकानें ग्रामपुनर्घटनेचें कार्य सुरु केले आहे. बेळगांव जिल्ह्यांतील आतलगे, रत्नागिरीतील परुळे, गुलबर्ग्यातील आळंद, खानदेशांतील कलसाडी, नाशीक जिल्ह्यांतील जातेगांव, ठाणे जिल्ह्यांतील नेरळ अशा गांवीं पथकानें केन्द्रे उघडून तेथे शहरांतील विद्यार्थी व त्या गांवचे गांवकरी यांच्या