पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
भारतीय लोकसत्ता

दुर्दैवाने तेथे रशियाप्रमाणेच दण्डसत्ता, अगदीं शुद्धं मार्क्सवादी दंडसत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे ३५-३६ कोटी जनतेचे आपल्या भूमीत प्रस्थापित झालेले स्वयंशासन जगाच्या इतिहासांत पहिलेच आहे.
 भारतीय जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीची स्थिति आणि तिच्या लोकसंख्येचा अफाट व्याप एवढ्या दोनच गोष्टी ध्यानांत घेऊन आपल्या लोकसत्तेकडे पाहिले, तरी तिची अपूर्वता ध्यानात येईल. मग येथले धर्मभेद, पंथभेद, प्रांतभेद, जातिभेद, भाषाभेद यांचा विचार केला, येथले संस्थानिक, येथले जमीनदार व येथले भांडवलदार हे जमेस धरले; येथले अज्ञान, दारिद्र्य; येथली शास्त्रविमुखता, येथली रूढिप्रियता लक्षांत आणली; आणि या देशाचा १६ लक्ष चौरस मैलाचा अफाट विस्तार ध्यानांत घेतला म्हणजे एवढ्या विरोधी व विधातक शक्ति विद्यमान असूनहि त्यांच्यावर मात करून यशस्वी होणाऱ्या आपल्या लोकशासनाची अपूर्वता कांहीं निराळी आहे, ही खरोखरी कांहीं अद्भुत घटना घडली आहे व घडत आहे, या विधानाच्या सत्यतेची वाचकांना काही अंशी तरी प्रतीति येईल.

तुलनेनें पहा

 हे सर्व तुलनेनें लिहिलेले आहे. सध्यां भारतांत कमालीचे दारिद्र्य आहे; बेकारी वाढत आहे; गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे; प्रत्येक प्रांतांतील काँग्रेसपक्षांत दुही माजली आहे; सरकारच्या प्रत्येक खात्यांत हृदयविदारक गोंधळ माजला आहे; नीति या भूमींतून नाहींशीच झाल्यासारखी भासत आहे. असे सर्वत्र दिसत असतांना भारताची लोकशाही यशस्वी झाली असे कोणत्या तोंडाने म्हणावे असा आपल्याला प्रश्न पडतो. तो प्रश्न खराच आहे. त्याविषयीं कांहीं निराळें मत असल्यामुळे आपल्या लोकशाहीचा हा गौरव केला असें नाहीं; पण मेक्सिको, ब्राझील, चिली, पेरू येथे अर्वाचीन काळांत स्थापन झालेल्या लोकसत्ता; फ्रान्ससारखी जुनी लोकसत्ता; पोलंड, झेकोस्लोव्हाकिया या देशांत दोन युद्धांच्या मध्यंतरांत स्थापन होऊन विलय पावलेल्या लोकसत्ता रशिया, चीन येथें तेथील लोकांच्या व विशेषतः नेत्यांच्या मते उदयास आलेल्या नव्या लोकसत्ता या सर्वोच्या तुलनेने पाहिलें तर कसलीहि पूर्व परंपरा नसतांना, अनंत भेदांनीं