पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रकरण चौदावें
सामाजिक पुनर्घटना
हिंदु व मुसलमान

 आपली लोकसत्ता यशस्वी व्हावयाची तर अखिल भारतीय समाज हा एकरूप, संघटित व अभंग होणे कसे अवश्य आहे, हे मागील प्रकरणांतून विशद करून सांगितले. ज्या अनेक भेदांनीं आपला समाज विच्छिन्न झालेला आहे, त्यांतील ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यअस्पृश्य व हिंदुमुसलमान हे प्रमुख भेद होत. यांपैकीं तिसरा भेद म्हणजे हिंदुमुसलमान. हा भेद म्हणजे भारताच्या संघटित जीवनाच्या दृष्टीने अत्यंत कठीण असा प्रश्न आहे. याच्या तुलनेने पहिले दोन भेद कांहींच नव्हेत. कारण कांहीं झालें तरी त्यांतील सर्व पक्षांची हिंदुस्थान ही आपली मायभूमि आहे, तिचा उत्कर्ष हाच आपला उत्कर्ष, त्या उत्कर्षासाठी वाहून घेणे यांतच आपल्या जीविताची सार्थकता आहे, अशी दृढ व अचल निष्ठा आहे. येथील प्राचीन संस्कृतीविषयीं व ती निर्माण करणाऱ्या महापुरुषांविषय त्यांच्या मनांत गाढ अशी भक्ति आहे. श्रीकृष्ण, रामचंद्र, व्यासवाल्मीकि येथपासून श्रीशिवछत्रपति, टिळक, महात्माजी, अरविंद, सुभाषचंद्र या थोर परंपरेचा ते अभिमान बाळगतात. ही निष्ठा, ही भक्ति, व हा अभिमान मुसलमानांच्या ठायीं नसल्यामुळे हिंदु व मुसलमान या समाजांच्या ऐक्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. तो किती बिकट आहे, हिंदुमुसलमान हा प्रश्न स्वातंत्र्य- पूर्वकाळाप्रमाणेच आज स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर व पाकिस्तानच्या निर्मिती- नंतरहि पूर्वीइतकाच कठीण कसा आहे, याची पुढील माहितीवरून कल्पना येईल.
 १९३७ सालीं प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. त्यांत मुस्लीम लीगला कोणच्याहि प्रांतांत बहुमत मिळाले नव्हते; इतकेच नव्हे, तर मुस्लीम लीग हा पक्ष राजकाणांत विचारांत घेण्याजोगा मुळींच नाहीं,