पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२०
भारतीय लोकसत्ता

आहे. पण हे कार्य दिसावयास इतके सोपे असले तरी मानवाचा आजपर्यंतचा इतिहास पहातां असे दिसते की, सर्वांत दुःसाध्य अशी एखादी गोष्ट असेल तर ती हीच आहे. स्वातंत्र्यानंतरचा आपला इतिहास पहातां तोहि हीच साक्ष देणार असे वाटू लागले आहे.
 मानवाच्या आंतरिक गुणांच्या संपादनाच्या दृष्टीने गेल्या पांचसहा वर्षांचे आपल्या समाजाचे चित्र पाहू लागलो तर मन खेदानें व्याप्त होते. भावी काळासंबंधीं भीति वाटू लागते आणि मनाचा धीर सुटल्यासारखा होतो. या क्षेत्रांत प्रगति तर नाहींच. पण दरवर्षी, दरदिवश, नव्हे प्रतिक्षणी, प्रतिपदीं आपण अधःपाताकडे चाललो आहो आणि तेहि अत्यंत वेगानें घसरत आहोत, असे दिसून येत आहे. लोकायत्त भारताचे सार्वजनिक जीवन आपण तपासू लागलो तर त्या जीवनाचें प्रत्येक अंग नासलेलें, सडलेले आहे, असे आढळू लागते. मानवी गुणांची संपत्ति आपण पोषिली तर नाहींच पण स्वातंत्र्यापूर्वी तिचा जो कांहीं सांठा आपल्याजवळ होता तोहि आपण गमावून टाकून दिवाळखोरीच्या काठावर येऊन उभे राहिलो आहो. येथून विनिपात फार दूर नाहीं. अनेक शतकानंतर आज आपणांस स्वतंत्र्याची प्राप्ति झाली आहे. पण आतां विश्वप्रयत्न करून मानवाच्या आंतरिक धनाची जोपासना केली नाहीं तर पूर्वसूरीनीं भगीरथ प्रयत्नांनी आणलेली ही गंगा तशीच वाहून जाईल आणि आपण पूर्वी अनेक शतकें नरकांत पिचत पडला होतो तसेंच पुन्हां पडून राहूं. ही आपत्ति येऊं नये म्हणून या भूमीच्या तरुण कन्यापुत्रांनी जिवाचा पण लावून अवश्य त्या सद्गुणांची जोपासना प्रथम स्वतःच्या ठायीं व नंतर समाजांत केली पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रथम वस्तुस्थितींचें दर्शन घडवून मग त्या गुणांच्या जोपासनेसाठी त्यांनी कोणचे मार्ग अनुसरावे हें या प्रकरणांत सांगावयाचे आहे.
 वर सांगितलेले मानवाचे जें आंतरिक धन म्हणजे त्याच्या मनाचे व बुद्धीचे गुण त्याचे दोन भागांत वर्गीकरण करता येईल. कार्यक्षमता व नीतिमत्ता हे ते दोन भाग होत. यांमध्ये मानवाच्या सर्व गुणांचा समावेश होतो. त्यांतील कार्यक्षमतेचा प्रथम आढावा घेऊं आणि नंतर भारताच्या सार्वजनिक जीवनांतील नीतिमत्तेचा हिशेब करूं. कोणचेंहि कार्य अंगावर