पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
समतेचा महामंत्र

गोष्ट आपल्या ध्यानांत आली ती अशी की, त्या समाजधुरीणांनी प्रथमतः त्या मानवाला स्वतःच्या मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति आणून दिली. त्याचें स्वत्व, त्याच्या मनुष्यत्वाचा अहंकार हा प्रथम त्यांनी जागृत केला आणि अशा रीतीनें या भूमीत त्यांनी नवयुग निर्माण केले.
 मानवाची प्रतिष्ठा जागृत करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी या प्रतिष्ठेचा पहिला शत्रु जो अंध आचारधर्म त्यावर प्रथम हल्ला चढविला, हें मागें सांगितलेच आहे. पण एवढे करून ते स्वस्थ बसले नाहीत. या आचारधर्माइतकीच आपल्या समाजरचनेच्या बुडाशी असलेली जन्मनिष्ठ उच्चनीचता हीहि लोकसत्तेला विघातक आहे, हे ध्यानीं घेऊन याहि रोगाचें निर्मूलन करण्याचे त्यांनीं शक्य ते प्रयत्न सुरू केले व समतेच्या महामंत्राच्या जपयज्ञाला प्रारंभ केला.

विषमतेवर आघात

 या बाबतीत पहिला कांहींसा संघटित प्रयत्न महाराष्ट्रांत मराठी भाषेचे पाणिनि दादोबा पांडुरंग यांनी केला. जातिभेदाने आपल्या समाजाचा नाश झाला आहे हा विचार त्यांनी सुरतेस 'मानवधर्मसभा' स्थापन केली त्याच वेळी त्यांच्या मनाशीं निश्चित झाला होता. या सभेचे जे सात सिद्धांत आहेत त्यांत 'मनुष्यमात्राची जाति एक आहे' व 'मनुष्यामध्यें उत्तम कोण व अधम कोण हें गुणावरून ठरवावें' असे दोन आहेत. पण याप्रमाणे केवळ सिद्धांत सांगून दादोबांचें समाधान झाले नाहीं. हा विचार कृतींत आणण्यासाठी त्यांनी १८५० च्या सुमारास 'परमहंस सभा' या नांवाची संस्था स्थापन केली. १८४६ मध्ये शाळा-शिक्षक तयार करण्याचा जो नॉर्मल क्लास निघाला त्याचे डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्या शिक्षकांना ते जातिभेदाची अनिष्टता पटवून देऊन तो नष्ट करून टाकण्याची आवश्यकता किती आहे ते समजावून देत असत आणि याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ही 'परमहंस सभा' स्थापन केली होती. या सभेंत सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांना प्रवेश असे. प्रथम सभासद होतांना नव्या गृहस्थाला 'मी जातिभेद मानणार नाहीं.' अशी प्रतिज्ञा करावी लागे. नंतर त्यास किरिस्तावानें केलेल्या