पान:भारतीय लोकसत्ता.pdf/६

हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

अशा प्रतिनिधींच्या सभेने राज्य करावे अशी सध्यांची पद्धत आहे. तशी त्याकाळीं नव्हती. त्याकाळी त्या गणराज्यांचे आकारमान फार लहान होते. कित्येकांची मर्यादा एका नगरीपुरती असे आणि जास्तीत जास्त विस्तार म्हणजे चारपांच जिल्ह्यांच्या एवढा असे. याहून मोठे गणराज्य त्याकाळीं कोठेच अस्तित्वांत नव्हते; सभासदत्वाच्या योग्यतेचे जे कोणचे अवश्य गुण ठरलेले असत, त्या गुणांनी युक्त असे सर्वच लोक सभेचे सभासद होत आणि राज्य करीत. यामुळे हीं प्रजातंत्रे आकाराने लहान असली, तरी अनेक ठिकाणी लोकसभेच्या सभासदांची संख्या पुष्कळच मोठी असे. सध्या भारताची लोकसंख्या छत्तीस कोटीच्या आसपास आहे; तरी आपल्या केन्द्रीय लोकसभेत सहाशेपर्यंतच सभासद आहेत. पण प्राचीन काळी बहुतेक सर्व प्रौढ नागरिक सभासद होऊं शकत असल्यामुळे लिच्छवी या लोकराज्याची लोकसंख्या १ लक्ष ६८ हजार असूनहि त्याच्या विधिमंडळांत ७७०७ सभासद होते. या सर्वांना अभिषेक होई व त्यांना 'राजा' ही पदवी मिळे. यौधेयांच्या प्रजासत्ताकराज्यांत असेच पुष्कळ म्हणजे ५००० सभासद असत. प्राचीन ग्रीक नगरराज्यांत आपणांस हाच प्रकार आढळतो. येथेहि अप्रत्यक्ष म्हणजे प्रातिनिधिक पद्धति उदयास आलेली नव्हती. इतकेंच नाहीं तर ग्रीक लोक ती पद्धत आक्षेपार्ह आहे, असेंच मानीत असत. त्यांच्या मते निवडून दिलेल्या प्रतिनिधींची सत्ता ही खरी लोकसत्ताच नव्हती; त्यामुळे तेथील लोकसभेत राज्यांतील सर्व प्रौढ पुरुष सभासद म्हणून बसत. अथेन्सच्या लोकसभेचे ४२००० सभासद होते; याचप्रमाणें स्पार्टा, सिराक्यूज इ. लोकसत्ताकांच्या सभांच्या सभासदांची संख्या मोठी असे. अर्थात इतके सर्व सभासद दरवेळी उपस्थित असत असे नाहीं. ग्रीक लोकसभांत सामान्यतः हजार दीड हजार उपस्थिति असे, तसेच आपल्या वर निर्देश केलेल्या लिच्छवि व यौधेय या गणराज्यांत ५०० ते ७०० पर्यंतच सभासद सामान्यतः हजर रहात असावेत. असो. त्या काळी प्रातिनिधिक पद्धत नव्हती आणि प्रत्यक्ष पद्धतीने लोकशाहीचा कारभार चालत असे, येवढाच महत्त्वाचा भाग आहे.
 शासनाचा प्रत्यक्ष कारभार चालविण्यासाठीं या लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष, सेनापति, मंत्री यांची निवड करीत. अध्यक्ष-उपाध्यक्षांना अनेक