या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषाशास्त्र.
भाग पहिला.
भाषाशास्त्राचे सामान्यविवेचन व
एकंदर भाषांचे दिग्दर्शन.
भाषाशास्त्र हा विषय इतका व्यापक आणि महत्वाचा आहे कीं, त्याचे विवेचन करणें म्हणजे ह्या भूतलावर ज्या ज्या भाषा पूर्वीं प्रचारांत होत्या, किंवा ज्या सांप्रतकाळींही प्रचारांत आहेत, त्या सर्वांचे समग्र वर्णन अथवा इतिवृत्तांतच देणें होय. किंबहुना, भाषाशास्त्र म्हणजे एकंदर भाषांचें ऐतीह्य, त्यांची प्रथमची व नंतरची स्थिति, त्यांचा उद्गम, आणि त्यांची मूलपीठिका, इत्यादि संबंधाची तपशिलवार हकीकतच समजावयाची, असेंही म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. अर्थात् , आर्य व अनार्य, प्राचीन व अर्वाचीन, पौरस्त्य आणि पाश्चात्य, द्वीपीय व सामुद्रिक, वगैरे सर्व भाषांचे साद्यन्त वर्णन ह्यांतच आलें पाहिजे, हें आणखी विशेष रीतीनें खचितच सांगावयास नको.