या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
भाषाशास्त्र.

पृथिवीवरील एकंदर भाषा.

 इ. स. १७८७ सालीं, रूस देशांतील कॉथराईन् नांवाच्या महाराणीने स्वतः परिश्रम घेऊन, आणि आपल्या विस्तीर्ण राज्यांतील सुभेदारांकडून, व ठिकठिकाणच्या राजकीय वकीलांस पत्रें लिहून, ह्या भूतलावरील एकंदर भाषांसंबंधी पुष्कळ माहिती मिळविली. इतकेंच नव्हे तर, ह्या उपलब्ध झालेल्या माहितीवरून, तिनें एक कोशही तयार करविला. पुढे, इ० स० १७९०-९१ सालीं, विल्हेवारीप्रमाणें त्यांतील शब्द लावून, त्याचे एकंदर चार भाग केले, आणि सदरहू कोशाची दुसरी आवृत्ति छापिली. त्यावरून असे कळून येतें कीं, चारही खंडांमिळून, ह्या पृथिवीवर एकंदर (२८०) दोनशे ऐंशी भाषा आहेत. ह्यापैकीं, १८५ आशिया खंडांतील असून, ५२ युरोपखंडांतल्या, २८ आफ्रिकेतल्या, व १५ अमेरिकाखंडांतील होत. तथापि, ह्या गोष्टीला आज सुमारे शंभर वर्षांवर होऊन गेली असल्यामुळें, ह्या मुदतींत कांहीं अन्य भाषांचा शोध लागला जाऊन, कित्येक नूतन भाषांचीही त्यांत भर पडली असावी, असें वाटतें; आणि तसें होणें देखील अगदीं साहजीक आहे.

 आतां, हा कोश जरी पुष्कळ उपयुक्त, व बऱ्याच अंशानें महत्वाचा आहे, तथापि, त्यांत एकंदर भाषांची वर्गवारी पद्धतशीर रीतीनें, किंवा शास्त्रीय दृष्टया, केलेली


 १ बादशाही कोश. Glossarium Comparativum Linguarum totius Orbis, Petersburg, 1787, पहा.

 हरवॉम्च्या भाषासंग्रहावरून, एकंदर तिनश्यांवर ह्या भूतलावरील भाषा असल्याचे होते. (१-६३).