पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/44

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

 १. गौण-जेथें एखाद्या पदार्थातील एखाद्या धर्माचें वर्णनीय पदार्थांशीं सादृश्य दाखविण्याकरितां त्या दोन्ही पदार्थांत अभेद दाखविला असतो, तेथें त्यास गौणलक्ष्यार्थ ह्मणतात. हें सादृश्य, पदार्थांतील गुणाचें असल्यामुळें ह्यास गौण असें नांव दिलें आहे. सारांश, सादृश्यावरून जो लक्ष्यार्थ होतो, तो गौणलक्ष्यार्थ होय. जसें--

 (१) "ह्या कामांत शेवटीं त्यांनीं अशी तोडजोड केली."

 (२) "ही वाटाघाट झाल्यावर शेवटीं असें ठरलें."

 ह्या वाक्यांत सुताराचें काम जें तोडणें व जोडणें, त्याच्या सादृश्यावरून 'तोडजोड' आणि पुरण शिजल्यावर जें घाटणें व वाटणें होत असतें, त्याच्या सादृश्यावरून वाटाघाट, हे शब्द बनले आहेत. तेव्हां वास्तविक, हे शब्द लाक्षणिक होत. ह्याचप्रमाणें--

 (१) असें कानीं पडतांच त्यानें 'पौबारा' केला.

 (२) हं, पाहतोस काय, आतां ठोक "सू बाळ्या."

 (३) मी आपल्या जिवाचा "आटापिटा" करून सोडलें, परंतु तें पोर "वाहवलें" तें वाहवलेंच.

 २. शुद्ध - सादृश्यावांचून इतर कारणांनीं उत्पन्न होणारा जो लक्ष्यार्थ, तो शुद्ध लक्ष्यार्थ होय. जसें - गुणवाचक पदानें गुणी पदार्थाचा बोध होणें. उदाहरण--

 "गोऱ्या न्यायाधीशासमोर, काळ्या गोऱ्याचा न्याय गेला असतां, काळ्याचा पराजय होणें विहितच आहे."