पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदलला तरी 'लोकधारणा' एक आहेत. गोव्यातील ख्रिस्ती समाज देवीला फुलांची छत्री श्रद्धापूर्वक अर्पण करतो. त्या संदर्भात मिळालेले उत्तर असे. 'आमच्या पिढ्या याच मातीतून उगवल्या. इथेच मातीत मिळाल्या. कुणा पूर्वजाने पाव टाकलेल्या विहिरीतले पाणी प्याले म्हणून तो किरिस्ताव झाला. पुढच्या पिढ्या किरिस्ताव म्हणून जगल्या. त्यावेळी त्याच्या पाठीवर हात ठेवून, पावाचा स्पर्श झालेले पाणी धर्म बदलू शकत नाही असे 'पोथी' वाचून धर्म सांगणाऱ्यांना खडसावून सांगणारा, सहृदय धर्मपंडित भेटला असता तर आज आम्ही हिंदू असतो. मूळ धर्म कोणताही चांगलाच. माणूसपण देणारा. शेवटी या मातीतून आमच्या मनात गोंदलेल्या श्रद्धा नाहीशा कशा होणार ? आम्ही दरवर्षी ही छत्री आमच्या गावदेवीला श्रद्धेने अर्पण करतो. तीच आमची आई.
 जोगाईला अनेक मुस्लिम स्त्रिया श्रद्धेने नमस्कार करतात. हळदीवाले, तडवी ही जमात अशी आहे की त्यांच्या स्त्रियांची नावे हिंदू असतात. त्यांचा पेहेराव भारतीय पद्धतीचा असतो. ज्यांचे धर्मांतर जबरदस्तीने झाले अशांच्या 'लोकधारणा' पूर्णपणे भारतीय आहेत. भूमीची पूजा करणारी 'येळा आवस' मुस्लिम शेतकरीही साजरी करतो.
 या सर्व गोष्टींचा विस्ताराने अभ्यास करताना लक्षात आले की भारतातील विधिउत्सव, व्रते, तत्संबंधी गाणी यांच्यातील एकात्मतेचा मूलभूत आधार 'भारतीय राष्ट्रीयत्व' हा आहे. डॉ. लोहियांनी स्पष्ट बजावले होते. 'जे मन भयहीन, वासनाहीन आणि नैराश्यहीन असते तेच योग्य विचार करू शकते.' हा वारसा व भूमिका घेऊन प्रस्तुत शोधनिबंधाची मांडणी केली आहे.

  'जमिनीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधी, उत्सव आणि गाणी' -
 या विषयाच्या शोधनास प्रारंभ करताना, विधी आणि उत्सव यांची मराठवाडा पातळीवर निश्चिती केली. सुरुवातीला बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील गावांना भेटी दिल्या. या भागात पेरणीपूर्वी तिफणीची पूजा करतात. सुताराचा सन्मान करतात. अकोला, खामगाव भागातही ही पूजा प्रचलित आहे. तिफणीची आरती ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रंथालयातून मिळाली. मराठवाड्यातील बीड, लातूर,

भूमी आणि स्त्री