पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

(शुनासीर कृषिकर्माला सफल करणाऱ्या विभूती) आम्ही केलेली स्तुती ग्रहण करा, आकाशमंडलात तुम्ही जे उदक उत्पन्न केलेत त्यानेच ही जमीन भिजवा. भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर. तुला आम्ही वंदन करतो.
 बैलांच्या श्रमातूनच धनधान्याची विपुल निर्मिती करता येते याची जाणीव प्राचीन समाजाला होती. ज्या हातांनी बैलाला आसूड मारायचा, मानेला जू घट्ट बांधायचा त्याच हातांनी त्या बैलांच्या खांद्याना लोणी हळद मळून त्यांच्यावर माया करायची ही परंपरा पूर्वजांनी निर्माण केली. बैलांच्या श्रमाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा.
 पोळ्याच सण आला -
 श्रावण अमावास्येस मराठवाडा परिसरात पोळ्याचा सण अत्यन्त श्रद्धेने साजरा केला जातो. काही भागात याला बैलपोळा असे म्हणतात. तर काही भागात बेंदूर असे म्हणतात. बैल नांगर ओढतात. रात्रंदिवस श्रम करतात.अन्ननिर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांनी केलेल्या श्रमांबद्दलची कृतज्ञता महाराष्ट्र आणि भारतातील इतर भागांतही सणाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. सर्वसाधारणपणे श्रावण अमावास्येस पोळ्याचा सण साजरा केला जातो. विभागपरत्वे आषाढ, भाद्रपद अमावास्येसही पोळा साजरा करतात.
 आदले दिवशी खांदे मळणी -
 पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी जोडीने, शेतकरणीसह बैलांजवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर मायेची थाप मारतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांत या मुक्या कष्टकऱ्या विषयीची अपार कृतज्ञता दाटलेली असते. त्या स्नेहल स्पर्शाने बैलही सुखावतात. वर्षभर जू वाहून पराणीचे फटके खाऊन, श्रमलेल्या खांद्यांना शेतकरी हळद आणि लोणी लावून मळतो, धान्याच्या धुगऱ्या त्याला प्रमाने खाऊ घालतो. तसेच बैलांना दुसरे दिवशी जेवायला येण्याचे आवतण देतो. मराठवाड्यात पूर्वी शेतकरी गाणी म्हणत, बैलांची खांदेमळणी करीत. आज मात्र ही गाणी हरवत चालली आहेत. तरीही

भूमी आणि स्त्री
१७३