पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विश्वनिर्मितीचे, सृजनाचे केंद्र आहे. उगम स्थान आहे. तिच्यात अलौकिक आणि विलक्षण यातुशक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा होती.या विश्वात प्रथम मृत्यूचे साम्राज्य होते. म्हणजे भुकेचे साम्राज्य होते. देवांनाही भुकेचे भय असे. अन्न निर्मिती ही महत्त्वाची प्रेरणा आणि समस्या होती. देवांनी त्रयीविद्येच्या छंद, लय व तालबद्ध साममंत्रांच्या आश्रयाने अन्न प्राप्त करून घेतले. ऐतरेय ब्राह्मणात याची विस्तृत माहिती मिळते. भूक म्हणजेच मृत्यू.

"न एव इह किचिनाग्र आसीत् मृत्यूना एव इदं
आवृतं आसीत् । अशनायया अशनाया हि मृत्युः"

 त्यांनी छंदोगानाने अन्न प्राप्ती करून घेतली व मृत्यूचे भय नष्ट केले. विशिष्ट कामनांच्या परिपूर्तीसाठी कोणत्या छंदाची योजना करावी याची विस्तृत माहिती ऐतरेय ब्राह्मणग्रंथात दिली आहे. या छंदांचा निरनिराळ्या कामनापूर्तीसाठी विनियोग सांगण्यात आला आहे. उदा. बौद्धिक तेज प्राप्तीसाठी गायत्री, पशुधन प्राप्तीसाठी जगती आणि अन्नप्राप्तीसाठी विराज छंदाची योजना आहे. यावरून असे लक्षात येईल की वाणी, छंद, सामगान यात यात्वात्मक सामर्थ्य असते, अशी वैदिकांची श्रद्धा असावी. वैदिकांचे पूर्वजही ईहलोकपर कामनांच्या परिपूर्तीसाठी मंत्रगान करीत.
 व्रतांमधील यात्वात्मक सामर्थ्य : त्यांतील स्त्रीप्रधानता -
 येथील लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य हे आहे की, ईहलोकपर कामनांच्या पूर्तीसाठी व्रताचरण करणे. चैत्र, श्रावण, भाद्रपद, आश्विन, पौष आदी महिन्यांतील व्रतांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास असे लक्षात येते की वरील विधान यथार्थ आहे. रवीन्द्रनाथांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर यांनी बंगालमधील व्रतांचे सूक्ष्म निरीक्षण करून अभ्यास केला होता. व्रतांचे वैशिष्ट्य ते पुढील शब्दांत सांगतात.
 A Vrata is a just desire. We see it represented in the pictures, listen to its echo in the songs and rhymes, witness it's reactions in the dramas and dances, in short, the Vratas are but desires as sung, the painted desires, desires as among and living.
 यात्वात्मक सामर्थ्याने कामनापूर्ती करण्याचे माध्यम म्हणजे व्रत. त्यातील प्रार्थनांत ईश्वरीकृपेचा संबंध नसतो. व्रताचरण हे सामूहिक कर्म असते. प्रार्थनेचे

भूमी आणि स्त्री
१७