पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मूर्ती जवळच्या विहिरीत विसर्जित करतात. जेथे मूर्ती विसर्जित केली जाते तेथील थोडी रेती आणून ती सर्वत्र शिंपडतात. धान्याच्या कोठीत ठेवतात. त्यामुळे धान्य सुबत्ता वाढते अशी श्रद्धा आहे. ती मराठवाडा वा महाराष्ट्रातही आहे.
 नवरात्राला 'नाडहब्बे' म्हणतात. या उत्सवास दक्षिणेत राष्ट्रीय उत्सव मानले जाते. तामिळनाडूत आषाढ कृष्णाष्टमीपासून तिरुकल्याणपर्व सुरू होते. हा सोहळा १७ दिवसांचा असतो. त्यात स्त्रिया तैवारम ही गाणी गातात. समूहाने गातात. आंध्रातील गणेश चवथीस मुगाची डाळ व गुळाचे पाणी हा प्रसाद असतो तर कर्नाटकात गणेशचतुर्थीचे आदले दिवशी तृतीयेला घुगऱ्या करतात. त्या उंदरांसाठी शेतात जाऊन टाकतात. नवरात्र दसरा हे उत्सवही स्त्रियांचे असतात. दहा दिवस हळदीकुंकू असते. बोम्मल कोलुकु म्हणजे नवरात्र. आंध्रातील तेलंगणात नवरात्रात खास मुलींचा उत्सव साजरा करतात. त्याला बदकम्मा म्हणतात. या उत्सवाचे नाते महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या भोंडला, हादगा, भुलाबाई यांच्याशी फार जवळचे आहे. तेलंगणात दिवाळी हा उत्सव धान्यलक्ष्मीचा. भाताची कापणी या काळात झालेली असते. धान्याच्या लोंब्या आणून त्यांचा कुंचला करून तो झुलता कुंचला दारावर तोरण म्हणून लावतात. त्यातील दाणे चिमण्यांनी खावेत व धान्याची आबादी आबाद व्हावी ही इच्छा या मागे असते. कर्नाटकात दसऱ्यानंतरच्या अमावास्येस, आश्विन अमावास्येस बुक्कव्वाची पूजा करतात. पुरणाचा नैवेद्य करून तो शेतात नेतात. घरातील सर्वांनी शेतात जायचे असते. झाडाखाली पाट, दगड स्वच्छ करून मांडतात. चण्याच्या डाळीचे मुटके करून ते त्यांना वाहतात. हळदकुंकू कापसाची माळ घालतात. या दिवशी शेताची ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो.
 या काळातील सर्व भारतीय व्रते, उत्सव, सण शेताच्या सुफलीकरणाशी जोडलेले आहेत याचा प्रत्यय या सणांतून, विधींतून मिळतो.

२२२
भूमी आणि स्त्री