पान:भूमी आणि स्त्री.pdf/२५७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

या बियांची आणि जमिनीची सुफलन शक्ती होळीच्या राखेमुळे वाढते अशी कल्पना ग्रामीण परिसरात आहे. आजही घरातील स्त्रिया अंगणात, परसात या बिया टोचतात. त्यातून भरपूर भाजीपाला येतो.
 या ठिकाणी एक नोंद करावीशी वाटते. स्त्रिया आणि भाजीपाला यांचे अतूट नाते आहे. भूमीच्या सुफलनशक्तीच्या वाढीशी जोडलेल्या व्रतात भाज्यांचे, मिसळीच्या भाज्यांचे विशेष महत्त्व असते. हा उत्सव मराठवाड्यात अत्यन्त उत्साहाने साजरा होतो. होळी पौर्णिमा ते रंगपंचमी हे सहा दिवस वसंतोत्सवाचे असतात. होळीचा नैवेद्य पुरणपोळीचा असतो आणि नैवेद्य सायंकाळी दाखविला जातो. धुळवडीच्या दिवशी होळीच्या राखेने अंग घासल्यास उन्हाळा बाधत नाही असा समज ग्रामीण भागात रुढ आहे. या काळात महाराष्ट्रात 'वीर' नाचतात.
 'नाच रे वीरा नाच नाच । होळीला गौऱ्या पाच पाच' असे म्हणत वीर नाचून गौऱ्या, लाकडे गोळा करतात. महाराष्ट्रात माघी पौर्णिमेस एरंडाचे झाड, ज्या जागी होळी पेटवायची असते त्याजागी रोवतात. 'वीर' हा यक्षाचे प्रतीक असतो. यक्षोपासनेचा प्रभाव भारतभर आहे. यक्ष वृक्षावर राहतात असा समज रुढ आहे. होळीप्रमाणेच 'धुळवड' सामूहिकरीतीने खेळली जाते, धूलिवंदन या नावाने त्याचे संस्कृतीकरण केले तरी प्रत्यक्षात प्राकृत पद्धतीने धुळवड खेळली जाते. होळीच्या सायंकाळी बोंबा मारणे, शिव्या देणे हे प्रकार धार्मिक परंपरेचा एक भाग म्हणून केले जातात.
 होळी भारतभर साजरी होते -
 अनेक परंपरांच्या मिश्रणातून संकरातून आजच्या होळीचे रूप सिद्ध झाले आहे. आदिम अवस्थेतील मानवाला 'अग्नी'चा शोध लागला आणि अनेक संकटांतून तो मार्ग काढू शकला जंगली क्रुर श्वापदांपासून, स्वतःचे रक्षण करण्यापासून ते थेट थंडी पाऊस या नैसर्गिक संकटापासून रक्षण करण्याचे काम अग्नीने केले. अग्नी हा अत्यन्त महत्त्वाचा मानला गेला. शतपथ ब्राह्मणात पृथ्वीला ग्नगर्भा' म्हटले आहे. ज्याप्रमाणे माता पुत्राला गर्भाशयात धारण करते. त्याप्रमाणे पृथ्वी अग्नीला आपल्या पोटात धारण करते. (श. ब्रा. ६-५-१-११) अग्नी आणि आदिम मातृदेवता पृथ्वी

२५२
भूमी आणि स्त्री