पान:भूमी आणि स्त्री.pdf/४२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कृषिजीवी होता आजही आहे. आजही मराठवाड्यातील ८०% टक्के समाज शेतीवर अवलंबून असलेला आहे. ही टक्केवारी उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आधिक आहे. मराठवाड्यात कृषिजीवनाशी एकरूप झालेले, सुफलीकरण करण्याच्या भूमिकेतून निर्माण झालेले विधी, व्रते, सण, अधिक श्रद्धेने पाळले जातात.
 अ) सुफलीकरणाशी निगडित स्त्री देवता -
 गौरी, पृथ्वी, लक्ष्मी, इला, इनाई, भुलाबाई, धुरपा, जिवंतिका, सप्तमातृका, आसरा, कानबाई आदी अनेक. ही सर्व मूलतः भूदेवीची रूपे आहेत.
 ब) सुफलीकरणाशी संबंधित पुरुष देवता -
 म्हसोबा, भुलोबा, भांगलोबा, नागोबा, शिराळशेठ, गणपती, शिव, मुंजा, सविता उर्फ सूर्य.
 आदिमानवाने भूदेवी मातृस्वरूपात पाहिली -
 प्राचीन मानवाने विश्वजननीची विविध रूपे कल्पिली. ती निसर्गाच्या निरीक्षणांतूनच. जी शक्ती अर्भकाला जन्म देते तीच शक्ती भूमीतून नवा अंकुर निर्माण करते हे त्याने निरीक्षिले. या निरीक्षणातून त्याने भूमी व स्त्री यांना वंद्य आणि एकरूप मानले. भूदेवीची विविध रूपातून, विविध प्रसंगाने जी पूजा केली जाते, त्या मागे तिच्यातील सर्जन क्षमता वाढावी ही कामना असते. आदिमानवाने भूदेवीचे रूपमातृस्वरूपात पाहिले. मात्र हे मातृस्वरूप त्याने तीन रूपात कल्पिले.
 १. जगाला जन्म देणारी जगन्माता,
 २. अन्नौषधी निर्माण करून संपूर्ण जगावर ममत्वाचा हात फिरवणारी गौरी उर्फ लक्ष्मी,
 ३. दुष्ट शक्तींचा संहार करणारी परंतु प्रसंगी विविध रोग, दुष्काळ पसरवून प्रजेचा संहार करणारी उग्रचंडिका वा काली.
 भूदेवीची विविध रूपे सुफलीकरणाशी निगडित अशा व्रतांतून येतात. उदा. - गौरी, लक्ष्मी, जिवती, कानबाई,शीतलादेवी, धुरपा,यल्लम्मा, इला आसरा इत्यादी अनेक. ही दैवते शेतीनिष्ठ समाजात..... (महाराष्ट्रातील ६५% समाज शेतीशी जोडलेला आहे, आज विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठवाड्यात हे प्रमाण ८०% आहे) विशेष श्रद्धेने पूजिली जातात.

भूमी आणि स्त्री
३७