पान:भूमी आणि स्त्री.pdf/४८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सायंकाळी घरी येतात. अष्टमीला मिष्टान्नाचा पाहुणचार घेऊन नवमीस परततात. कनिष्ठा आणि जेष्ठा अशा दोघींची पूजा केली जाते. काही घरात उभ्या लक्ष्म्या असतात. लक्ष्म्यांचे मुखवटे त्या त्या कुळातील परंपरेनुसार असतात. लक्ष्म्या मांडणे शक्य नसेल तर धान्याच्या राशी मांडाव्याच लागतात. कोकणात याच काळात गौरी घरी येतात. कोकण, कोल्हापूर परिसरात गौरी खड्यांच्या व तेरड्याच्या झाडांच्या असतात. अष्टमीस पुरणावरणाचा नैवेद्य मराठवाड्यात असतो. कोकणात घावन घाटले असते. या पूजाविधीत फुलापानांना आणि नैवेद्यात शाकभाज्यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी उरलेले अन्न आणि खरकटे शेतात पुरले जाते. दोन लक्ष्म्यांपैकी अलक्ष्मी ज्येष्ठा असते. कनिष्ठा - लक्ष्मी असते. भारतीय संस्कृतीत अशुभाला शुभकारक बरून त्याला समाजमनात सन्मानाने सामावून घेण्याची ही प्रक्रिया सुरुवातीपासून आढळते. अशिवाचा शिव होतो. अलक्ष्मीची लक्ष्मी होते. विघ्नकर्त्यांचा विघ्नहर्ता होतो. प्रारंभी भयानक वाटणारी शक्ती अशुभाचे निवारण होऊन शुभ होते. या भूमिकेची विस्तृत चर्चा, त्या त्या व्रतांच्या निमित्ताने येईलच.
 चैत्रात वसन्तगौर घरी येते. अक्षय्यतृतीयेपर्यंत गौर माहेरी असते. चैत्रात झाडे मोहरतात. उन्हे तापू लागतात. धरती.... भूमाता याकाळात निवान्त असते. राने मोकळी असतात. सूर्याच्या ऊर्जेने जमिनीतील सुफलन शक्ती वाढत असते.
 धरणीच्या तीन रूपांची पूजा : नवरात्र -
 नवरात्रात धरणीच्या तीनही रूपांची पूजा होते. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. पत्रावळीवर माती पसरुन त्यात नऊ, सात वा पाच प्रकारची धान्ये पेरुन त्यावर घट बसवतात. कुमारिकांची पूजा केली जाते. अष्टमीला सुवासिनींची पूजा करतात. नवमीला कालिमातेची पूजा होते. नऊ दिवस अखंडदीप तेवतात. दिवा हे सूर्याचे प्रतीक, घटात पंचनद्यांचे पाणी असते. घट हे पृथ्वीचे प्रतीक असते. नवरात्र व्रताची सविस्तर चर्चा पुढे केली आहे.
 कानबाई -
 हे दैवत नाशिकचा काही भाग आणि खानदेशात विशेष करून पूजिले जाते. तपती उर्फ तापी नदी ही सूर्यकन्या मानली जाते. तिचा उगम मध्य प्रदेशातील निमाड भागात झाला असून ती सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगरांतून वाहत गुजरातमध्ये प्रवेशते. तिच्या परिसरात कानबाई या लोकदेवतेचे विशेष प्रचलन

भूमी आणि स्त्री
४३