हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४२ / भोवरा

नाहीसा झाल्यावर आता त्या प्रतीबद्दल काही बोलणे म्हणजे राजवाड्यांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, हाच वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.
 तसे पाहिले तर प्रत्यक्ष प्रमाण व आप्तवाक्य ही काही एकमेकांविरुद्ध नाहीत; तर पूरक आहेत. प्रत्येक सत्यशोधकाची बुद्धी शुद्ध असेल तर तो सत्यशोधन करण्यास लायक ठरतो व शुद्ध बुद्धीचाच मनुष्य आप्त होऊ शकतो. काही संशोधन तर बरेचसे आप्तवाक्यावरच अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील पावसाची सरासरी काढावयाची असेल तर काही विशिष्ट ठिकाणी पाऊस मोजण्याची यंत्रे ठेवलेली असतात. रोज एका विशिष्ट वेळेला बाटलीत किती पाऊस पडला हे पाहून त्याची रोजच्या रोज नोंद करावयाची असते. दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी ही टिपणे मुख्य कचेरीत पाठवावयाची असतात; व तेथे ठिकठिकाणी पडलेल्या रोजच्या पावसाची सरासरी काढून दर महिन्याची किंवा वर्षाची सरासरी काढायची, असा प्रघात आहे. एकच माणूस एका मोठ्या प्रदेशातील सर्व ठिकाणे रोजच्या रोज ठराविक वेळा तपासणे शक्य नाही; म्हणून दर ठिकाणी हे काम निरनिराळ्या माणसांवर सोपवलेले आहे. ह्यांपैकी एखाद्या माणसाने जरी खोटे कागद भरून दिले, तरी सबंध काम फुकट जाणे शक्य आहे. एका गावात असाच एक पाऊस टिपणारा मनुष्य होता. एका वरच्या कचेरीतून अनपेक्षितपणे एक तपासनीस त्या गावी आला. पाहतो तो नेमलेला मनुष्य जाग्यावर नाही. पण तक्ता मात्र सबंध पुढील आठवड्याचा भरून ठेवून पाकिटात घालून ठराविक तारखेला पोस्टात टाकण्यासाठी पोस्टमास्तरजवळ दिलेला!
 सध्याच्या शास्त्रीय युगात किती तरी संशोधन मुळी आप्तवाक्याच्या पायावरच उभे आहे. म्हणून प्रत्यक्ष आणि आप्तवाक्य ही निरनिराळी स्वतंत्र प्रमाणे न मानता पूरक प्रमाणे मानावी लागतात. प्रत्यक्ष दिसते तेही आभासमय असते व कोणते प्रत्यक्ष खरे व कोणते खोटे हे ठरविण्याला परत निरनिराळी प्रमाणे लागतात, त्याचप्रमाणे आप्तवाक्याचे आहे.
 समाजातील प्रतिष्ठित अधिकारी व्यक्तीचे म्हणणे विचार न करता खरे मानण्याची प्रवृत्ती असते. लहान मुले आणि लहान माणसे ह्यांना मात्र अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा खऱ्या म्हणून लोकांना पटवायच्या म्हणजे पंचाईत पडते.