या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यंदा आंब्याची झाडं पानोपानी मोहरली आहेत. घनदाट आंबाड्यावर मोतियारंगी सुरंगीच्या फुलांचे गच्च वळेसर माळून झोकात उभ्या असलेल्या सावळ्या कोळिणीची आठवण करून देणारी ही झाडं जागोजाग उभी आहेत. जणू पानांनी पंख आतल्या आत मिटून घेतले आहेत आणि इथून-तिथून उभारल्या आहेत मोहोराच्या गुढ्या, प्रत्येक झाडाच्या मोहोराचा रंग वेगळा, कुठे लालसर रंगाची महिरप तर कुठे पिवळसर रंगाची झूल, कुठे आकाशाची निळाई झेलणारी शुभ्रता तर कुठे मोतिया रंगाचा नाजूक नखरा.
 मोहोर हा शब्दच किती चित्रमय, न मोजता येणान्या लक्षावधी चिटुकल्या टिंबकटू कळ्यांचा हा झुलता मनोरा. मंद तरीही मादक गंधाने घमघमणारा. हा गंध अवघ्या आसमंताला कवेत घेतो.
 संध्याकाळची वेळ, घरी परतताना नाक एकदम जागे झाले. नकळत दहादिशांनी श्वास घेऊन काही शोधू लागले आणि नजरेने वेधले. आंब्याचे आकंठ मोहरलेले झाड. मनाशी खूणगाठ बांधली की थंडी आता साईसुट्यो म्हणणार आणि क्षितिजापल्याड पळून जाणार. माझ्या डोळ्यासमोर हिरव्यागार कैऱ्यांचे घुंगरू केसांत बांधून झुलणारी बंजारन उभी राहिली.

मनतरंग / १००