या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाडी येई. त्यातील जेवणच ते खात. दुकानातली कोणतीही वस्तू विकत घेण्याची मुभा त्यांना नव्हती. भोगवादी जाळ्यात अडकलेले व्यसनाधीन तरुण, पत्नी व मुलांचे गळे घोटणारे बाप, रिंकू, अमृताचे तरुण मारेकरी, खेड्यातल्या वा शहरातल्या पानाच्या ठेल्यावर उभी असलेली 'बेकरी'च्या होरपळीत तडफडणारी तरुण मुले...असे अनेक, पाहिले की वाटते, आमच्या भारतातही १६ ते १८ वयोगटातील मुलामुलींना सक्तीची राष्ट्रसेवा...सैनिकी शिक्षण अंतर्भूत - असायला हवी. केवळ राष्ट्रगीत ऐकून वा दूरदर्शनवरील देशप्रेमाच्या जाहिराती पाहून का कुठे तरुणांच्या अंतर्मनात अग्निबिंदू पेटत असतो ? त्यासाठी तरुणाईत प्रवेश करणाऱ्या, ज्यांच्या मनगटात उभारण्याचे आणि उद्ध्वस्त करण्याचे बळ आहे, मृत्यू ज्यांना फुलासारखा कोमलही वाटू शकतो अशा तरुण तरुणींना 'एन.एस.एस.' राष्ट्रीय सेवा योजना सारखी गोंडस देशसेवा सांगून चालणार नाही. या वयात त्यांच्या मनात एकच लक्ष्य गोंदवायला हवे.

"तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण !!"

 मग कारगिलच काय आमची कोणतीही सीमा - मग ती देशाची असो वा मनाची असो वा संस्कृतीची, ती सुरक्षित राहील.

■ ■ ■

मनतरंग / १३२