या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आनंद तर नाहीच पण घृणा वाटते. अनेकदा गिऱ्हाईक अंगचटीला येते. तेही सहन करावे लागते. परंतु आठ तास ड्यूटी केल्यावर किमान दोनशे रुपये हाती येतात. चारजणींचे नवरे त्यांच्या खेड्यात राहतात. दोघी नवऱ्यापासून वेगळ्या राहतात. दोघींचे नवरे दुसऱ्याच्या शेतात काम करतात.
 पंचवीस - तीस वर्षांपूर्वी शेतात कामे होती. पण आज शेतीची जमीनही कमी झाली आहे. आज सयाममध्ये बहुतेक माल आयात केला जातो. अशा वेळी फारसे न शिकलेल्या स्त्रियांच्या समोर महत्त्वाचे व्यवसाय असतात दोनच. एक म्हणजे वेश्यावृत्ती आणि दुसरा अंगमर्दनाचा. सायंकाळच्या अंधूक उजेडात पटाया चौदा वर्षांच्या नटरंगीसोबत जाणारे सत्तरीपुढचे गोरे तरुण पाहिले आणि मनात आले. आमच्या भारतातील भूमिकन्यांनी आपली शेती, अन्न तयार करण्याचे च्या समुद्रतीरावर कौशल्य, वस्त्र विकण्याची कला, निसर्गाने निर्माण केलेल्या पदार्थांतून नवनवीन वस्तू तयार करण्याची कामगिरी जपली नाही, तर आमचे या भूमीशी, भवतालच्या पाण्याशी, झाडांशी असलेले नाते संपून जाईल आणि एक दिवस पटायाचा बेधुंद... बेशरम किनारा आमच्या सुनहरी किनाऱ्यांवर आपले बस्तान मांडेल. नाते स्वदेशीशीच का ? हे पटायाने मनात गोंदवून ठेवले.

■ ■ ■

ते नाते संपून गेले तर... / ३९