या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मेळघाटातल्या घटांग डोंगरातले अगदी उंचावर वसलेले ते गाव. सेमाडोह या विदर्भ मध्यप्रदेशाला जोडणाऱ्या राजरस्त्यावरच्या खेड्यापासून तीन चार कोसांवर असलेले. चिखलदरा परिसरातील व्याघ्रप्रकल्प सुरू झाल्यावर, या परिसरातील अनेक खेडी उठविली गेली. आज या अभयारण्यातील वाघांची संख्या वाढून शहात्तरवर पोचली आहे. मात्र सीमेवरील काही खेडी अद्याप उठलेली नाहीत. अशा खेड्यांपैकी एक 'माखला'. त्याला भेट देऊन कोरकूचे जीवन जवळून पाहावे यासाठी आम्ही निघालो.
 या वर्षीचा पावसाळा मनमुक्तपणे बरसलाय. साग, आवळा, मोह या झाडांची गर्दी असलेले डोंगर, पानांचे दाट पिसारे ऐलपैल पसरून, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे आहेत. सातपुड्याच्या डोंगराचा हा भाग. धुक्याची तलम ओढणी माथ्यावर पांघरून उभे असलेले हे डोंगर पाहताना नजरेवर जणू कोणी चेटूकच करते. पंचवीस तीस अंशांच्या कोनात वळणारे, घनदाट उंच उंच झाडांच्या दाटीतून वळणावळणाने उंच उंच चढत राहणारे, अत्यंत निरुंद रस्ते.
 एका बाजूने उंच उंच हिरवी भिंत, तर दुसऱ्या बाजूला डोळे फिरावेत अशी दरी. अधूनमधून उड्या घेत, लडखडत धावणारे धबधबे. काठाने गुलाबी

आदिवासींना आम्ही केले वनवासी.../५९