मानसिक दुःखं, मानसिक यातना त्यांनी भोगल्या असतील ? तू त्यांची असून तुला फार तर मधूनमधून ते मदत देत. त्या वेळेस त्यांच्या मनाला किती दुःख होत असेल! आपण सुखात आहोत, चांगले खातपीत आहोत, गाडीघोडयांतून हिंडत आहोत परंतु आपली मुलगी तिकडे गरिबीत आहे या विचाराने तुझ्या पित्याला काय वाटत असेल ? झालं ते झालं आता तरी तुझ्या पित्याकडे ये. त्यांच्या मनाला शांति,समाधान दे. मंलाही तुझी आई होऊ दे. मला मूल ना बाळ तू आमची, आता खरोखरची आमची हो. नाही म्हणू नको. आमचे मोठे घर आनंदानं भर. गाणे गायला शीक. पेटी वाजवायला शीक. एवढे मोठे घर, परंतु मुंलांशिवाय ओस दिसते. तू ये. म्हणजे घरात प्रकाश येईल, संगीत येईल, एक प्रकारची मधुरता पसरेल. आमचा संसार सुखाचा व गोड होइल.सोन्ये, नाही म्हणून नको आमंचं ऐक. तुझ्यां पित्याचं ऐक. जगात आई बाप म्हणजे थोर दैवतं. तुझी आई गेली. परंतु सुदैवाने पिता आहे. तो पिता तुझ्यासमोर बसला आहे. इतक्या वर्षांनी आपला पिता आपणाला भेटला याचा तुला आनंद नाही होत ? तुझे हृदय उचंबळत नाही.? जगात पित्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं ! मनूबाबांची तुझ्यावर सत्ता आहे परंतु जन्मदात्या पित्याची अधिक आहे.”
सोनी एकदम उसळून म्हणाली, ” जन्मदात्यापेक्षा या प्राणदात्याची अधिक आहे. जन्मदात्याने जन्म दिला व जगात उघडे ठेवले. माझ्या आईला जगात उघडे ठेवले. मनूबाबांनी माझे सारं केले. त्यांनी आज पंधरा वर्षे मला वाढविले. लहानाच मोठे केलं. मलां जरा बरं वाटेनासं झालं तर मनूबाबा कावरेबावरे होत. मी त्यांच्या अंगाखांद्यावर मुतले असेन, हगले असेन त्यांनी ते सारं सहन केलं. त्यांनी माझी परकरपोलकी धुवावी, मला आवडणारी भाजी करावी. त्यांनी मला शिकवावं, गोष्टी सांगाव्या. त्यांनी माझे काय केलं नाही ? माझ्या शरीराची, मनाची, बुद्धीची, हृदयाची वाढ त्यांनी केली. माझ्या जीवनाची बाग त्यांनी फुलविली. त्यांना का सोडू? रोपटं लहान असतं, तेव्हाच उपटून दुसरीकडे लावलं तरं ते जगतं. परंतु जूनं झालेलं झाड उपटून दुसरीकडे लावू पहाल तर ते मरेल. मी लहान होते, अनाथाप्रमाणे हात पसरीत या गावात