हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "हो. देईन करुन. जाऊ मी? जाते हं बाबा." असे म्हणून ती गेली. आता ती दोघेच तेथे होती. मोकळेपणे बोलता आले असते.

 "काय बोलणार आहात मनूबाबा ?"

 "सोनी आता मोठी झाली. तिचं लग्न नको का करायला ?"

 "हवं करायला मी कधीच तुम्हाला म्हणणार होत्ये, पण म्हटलं की तुम्हाला वाईट वाटेल. सोनी सासरी गेली की तुम्ही एकटे राहाल. सोनीच्या दूर जाण्याचा विचारही तुम्हाला सहन होणार नाही. परंतु आता हवं हो करायला लग्न. सारं रीतीनं वेळीच झालं पाहिजे. नाही का ?"

 "हो अलीकडे हाच विचार माझ्या मनात येत असतो परंतु मी म्हातारा कुठे जाऊ नवरा शोधायला? तुम्ही सांगता का एखादे स्थळ? तुमच्या आहे का माहितीत एखादा मुलगा."

 "तसा डोळ्यांसमोर नाही. आणि सोनीला चांगलं स्थळ पाहायला हवं. तिला गरीबाघरी थोडी द्यायची आहे? तुमच्या मोहराही परत मिळाल्या आहेत. आता तुम्ही गरीब नाही. खर्च करू शकाल. सोनी सुस्थळी पडो. चार दागिने अंगावर पडोत. परंतु अशी स्थळं आम्हाला कुठे माहीत असणार? आम्ही गरीब माणसं, खरं ना मनूबाबा?" ती म्हणाली.

 "हे पहा साळुबाई, नवरामुलगा चांगला असला म्हणजे झालं. माणसं चांगली असली म्हणजे झालं. गरीब का असेना घराणं. माणसं श्रीमंत मनाची हवीत. सोनीला मी प्रेमानं वाढवलं. जरा लडिवाळपणाने बोलते सवरते. तिचे कौतुक करणारी माणसे मिळाली म्हणजे झालं. पैसे काय चाटायचे आहेत? आणि सोनीला नाही हो दागदागिन्यांचा सोस. दोन फुले केसात घालायला असली म्हणजे झालं असं म्हणते. आहे का असं स्थळ माहित? गरीब असले तरी चालेल."

 " सांगेन, लक्षात ठेवीन."

 "आता नाही सांगता येणार?"

 "आता एकदम कसं कोणतं सांगू मनुबाबा?"

 "डोळ्यासमोर असेल ते सांगा."

६६ * मनूबाबा