"तू चांगला आहेस. तो ठकसेन तर वाटेल ते करतो. त्याला काही धरबंधच नाही. तू माझी आशा. तू कुळाचं नाव राख. तू कुळाची परंपरा सांभाळ. आपली प्रतिष्ठा जाऊ देऊ नकोस. आणि संपत, आता घरचा कारभार तूच पाहू लाग. हिशेब वगैरे ठेव. जमाखर्च बघ. चांगला हो. समजलास ना?" पिता म्हणाला.
"होय बाबा, मी कारभार बघत जाईन. तुमचा त्रास कमी करीन. तुमचं सुख ते माझं." संपत म्हणाला.
एके दिवशी संपत वसूल गोळा करून येत होता. चारपाचशे रुपयांचा वसूल आला होता. बाबांना केव्हा एकदा सांगू असे त्याला झाले होते. इतक्यात तिकडून धाकटा भाऊ ठकसेन आला. त्याला चुकवून संपत जाऊ बघत होता. परंतु ठकसेन जवळ आलाच.
"दादा, भावाचा असा का रे कंटाळा करतोस? तुझ्याशिवाय मला करमत नाही. मी कुठं गेलो तरी तुझी आठवण येते. आणि पुन्हा मी तुला भेटायला येतो. आज बरेच दिवसांनी आलो तरीही मला पाहून तुला आनंद का होत नाही?" ठकसेनाने विचारले.
"ठकसेन, बाबांना तू आवडत नाहीस, म्हणून मलाही तू आवडत नाहीस. तू वाटेल तसा वागतोस. उधळपट्टी करतोस. तुला ताळतंत्र नाही. आपल्या घराण्याचा मोठेपणा तुझ्या लक्षात येत नाही. सारे लोक तुला हसतात, नावं ठेवतात. तुझ्याबरोबर मी राहीन तर मलाही नावं ठेवतील." संपत म्हणाला.
"दादा, तुझं मझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तुझ्यावर आहे. मला जे जे लागतं ते मी फक्त तुझ्याजवळ मागतो. तू नाही नाही म्हणतोस परंतु मला देतोस. तू वरून नाही दाखवलीस तरी मनात माझ्याबद्दल तुला सहानुभूती आहे. आज मी अडचणीत आहे. मला तीनशे रुपये पाहिजेत. कोठूनही दे. नाही म्हणू नकोस." ठकसेन हात धरून म्हणाला.
"कुठून देऊ पैसे? मागं दिले होते. आज पुन्हा कुठून देऊ? बाबांना हिशेब द्यायचा आहे. जाऊ दे मला" संपत रागाने म्हणाला.
"मी तुझा हात सोडणार नाही. तू माझा दादा. तू माझा मोठा भाऊ. तुझा आधार मी कसा सोडू? दादा, तू पैसे दिलेच पाहिजेस.