मला नाही देणार? तुझी ती गोष्ट,-हं. मी कोणाला ती सांगणार नाही. दादाची गुप्त गोष्ट मी कशी कोणाला सांगू? दादा म्हणजे कुळाचं भूषण, कुळाची कीर्ती. खरं ना? मी तुझी गोष्ट माझ्या पोटात ठेविली आहे. परंतु मला पैसे दे. फक्त तीनशे. अधिक नकोत." ठकसेन हसत म्हणाला.
"घे बाबा. तू तरी एक माझ्या मानगुटीस बसलेला गिऱ्हाच आहेस. पुन्हा नको मागू." संपत म्हणाला.
"पुन्हा लागले म्हणजे मागेन. दादाजवळ नाही मागायचे तर कोणाजवळ? गिऱ्हा म्हण, भूत म्हण, काही म्हण, पैसे देत जा म्हणजे झालं तुझी गोष्ट मी कधीही कोणाला सांगणार नाही, खरं ना?" असे म्हणून ठकसेन निघून गेला.
ठकसेनाचे उपद्व्याप सारखे चाललेले असत. त्याने कुबेराला भिकेस लाविले असते. खावे, प्यावे, चैन करावी यापलीकडे त्याला कर्तव्य नव्हते. तो रायगावात फारसा राहत नसे. पैसे घेऊन बाहेर जाई. तिकडे चैन करावी, रंगढंग करावे. पैसे संपले की तो घरी परत येई. तो वडिलांना कधी तोंड दाखवीत नसे. परंतु वडील भावाच्या पाठीस लागत असे. आणि काय असेल ते असो, वडील भाऊ त्याला भीत असे. ठकसेनाच्या हातात वडील भावाच्या जीवनांची कोणती तरी एक कळ होती. त्यामुळे दादापासून त्याला पैसे उकळता येत.
ठकसेन तीनशे रूपये घेऊन गेला. परंतु तीन महीने ही त्याला झाले नाहीत तो, तो पुन्हा आला. पैशासाठी पुन्हा दादाच्या खनपटीस बसला.
"दादा, मला पाचशे रूपये हवेत या वेळेस." तो म्हणाला.
"दादाला वीक आता व घे पैसे." संपत म्हणाला.
"दादाला कसं विकू? दादाची घोडी आहे ती फार तर विकीन. तुझी घोडी विकली तर पाचशे रूपये सहज मिळतील. देतोस मला तुझी घोडी? उद्या बाजारात विकीन. दादा, तु माझा आधार. आणि तुझी ती गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे खरंच." ठकसेन कावेबाजपणे हसून म्हणाला.
"घोडी कशी विकायची?" संपत संतापून म्हणाला.