हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "कशी म्हणजे? बाजारात. मी विकीन. तू नको येऊ. तुला तो कमीपणा वाटेल. नेऊ ना तुझी घोडी?" त्याने पुन्हा विचारले.

 "बाबा काय म्हणतील?" संपत खिन्नतेने म्हणाला.

 "जरा रागावतील. मग गप्प बसतील. मी घेऊन जातो घोडी. उद्या गुरांचा बाजार आहे शेजारच्या गावी. तिथं विकीन. माझी अडचण भागेल. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरंच." असे म्हणून ठकसेन घोडा घेऊन निघून गेला.

 शेजारच्या गावी गुरांचा बाजार भरला होता. सुंदर सुंदर घोडे तेथे विक्रीसाठी आणलेले होते. ठकसेनही घोडी घेऊन ऊभा होता. ती घोडी आसपास प्रसिद्ध होती. पुर्वी अनेकांनी ती घोडी विकत घेण्यासाठी खटपट केली होती. परंतु संपतरायाने ती कधीही दिली नाही.

 घोडीभोवती लोकांची गर्दी झाली.

 "हजार रुपये मागं एकजण देत होता. घोडी म्हणजे घोडी आहे." ठकसेन म्हणाला.

 "कोणाला पाहिजे तुमची घोडी? पाचशेसुद्धा कुणी देणार नाही." एकजण म्हणाला.

 "आपली वस्तु आपण होऊन बाजारात आणली म्हणजे तिची किंमत कमी होते." दुसरा म्हणाला.

 "खरोखरच विकायची आहे का?" तिसऱ्याने प्रश्न केला.

 "योग्य किंमत आली तर विकीन. नाही तर काही अडले नाही." ठकसेन कुर्ऱ्याने म्हणाला.

 "लोकांचंही अडलं नाही. परंतु संपतरायांची घोडी तुम्हांला कशी मिळाली?" कोणी तरी प्रश्न केला.

 "आम्ही दोघं भाऊ आहोत. मोठ्या भावानं ही घोडी मला बक्षीस दिली आहे." ठकसेन म्हणाला.

 "बक्षीस मिळालेली वस्तु का कोणी विकतो?" एकाने विचारले.

 "अडचण भासली म्हणजे भावना दूर ठेवाव्या लागतात." दुसरा म्हणाला.

१६ * मनूबाबा