हे पान प्रमाणित केलेले आहे.

वडिलांना नमस्कार करून दलपतराय म्हणाले, "दिगंबरराय, लक्ष्मीपूजन तर केलंत. परंतु घरात ग्रुहलक्ष्मी केव्हा आणणार? आमची इंदू तुमच्या संपतलाच द्यायची. दोघांचा जोडा किती शोभतो! आपण दोघे म्हातारे झालो. या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देऊ आणि डोळे मिटू."

 "दलपतराय, माझीही हीच इच्छा आहे. येत्या मार्गशीर्षात करून टाकू लग्न. सारं वेळीच झालं पाहीजे ऐकलंस ना संपत?" पिता म्हणाला.

 "चला ना बाबा!" इंदुमती पित्याला म्हणाली.

 "अग. आता या घरातच तुला राह्यला यायचं आहे. इथंच रमायचं आहे. लवकर चला का म्हणतेस?" पित्याने विचारले.

 "ती लाजते आहे. आपल्या बोलण्यानं दोघांना मनात गुदगुल्या होत असतील. परंतु वरून निराळं दाखवायचं. प्रेमाची ही रीतच असते. फूल हळूहळू फुलतं लाजत लाजत भीत भीत फुलतं. खरं ना?" दिगंबरराय म्हणाले.

 जगात दिवाळी चालली होती. लक्ष्मीपूजने होत होती. लाखो पणत्या पाजळल्या जात होत्या. जणू आकाशातील सारे तारेच पृथ्वीवर आले होते. परंतु त्या आनंददायक चार दिवसांत जगातील दुःखी जीव काय करीत होते? काही दुःखं अशी असतात की, ती आपण कधीही विसरू शकत नाही. उलट ती दुःखे अशा मंगल प्रसंगी अधिकच तीव्रतेने भासतात.

 ती पहा एक अनाथ स्त्री. एका लहान मुलाला वक्षःस्थळाशी धरून ती जात आहे. तिच्या अंगावर फाटके लुगडे आहे. तिचे हृदयच फाटलेले आहे. डोळ्यांतून पाणी गळत आहे. ती तरूण आहे. ती सुंदर आहे. परंतु तिचे तारूण व तिचे सौंदर्य कळाहीन दिसत आहे. जगाने तिची वंचना केली आहे. कोणी तरी पाप्याने तिला फसविले आहे. भोळा जीव. ती विश्वासून होती. आपला पती आपणाला एके दिवशी घरी नेईल अशी तिला आशा होती. परंतु किती दिवस आशा खेळवायची? सुंदर मूल झाले. मूल वर्षाचे होत आले तरी पती स्वगृही नेईना. जगात कसे राहावयाचे? लोक कुजबुजू लागतात. ती टीका कशी सहन करावयाची? आणि निष्पाप मनाला तर फारच कष्ट होतात.

२६*मनूबाबा