हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपले मूल घेउन ती तरूणी निघाली. पायी निघाली. चालून चालून तिच्या पायांना फोड आले. एका तीव्र भावनेने ती चालत होती. "आज त्यांच्या घरी. लक्ष्मीपूजन असेल. मोठा थाटमाट असेल. समारंभ होत असेल. शेकडो स्त्री-पुरूष आले असतील. अशा वेळेस तिथं जाऊन मी उभी राहीन. साऱ्या जगासमोर त्यांचं पाप उघडं करीन. त्यांच्या आनंदात विष ओतीन. मी त्यांची गृहलक्ष्मी. परंतु मला इकडे रडत ठेवतात. मी गरीब घराण्यातील असल्ये म्हणून काय झालं? गरिबांना का अब्रू नसते? मी गरीब होते, तर आले कशाला माझ्याजवळ? केवळ का माझी कातडी पाहून भुलले? किडे मेले. दुष्ट आहे पुरूषाची जात. मला पण सूड घेऊ दे. साऱ्या जगासमोर त्यांचं हिडीस स्वरूप उघडं करत्ये. लक्ष्मीपूजनाचे दिवे तेवत असतील. प्रकाश पसरला असेल, अशा सुंदर प्रकाशात त्यांची कृष्णकृत्यं जगासमोर मांडत्ये. जगाला ओरडून सांगेन...."

 परंतु तिच्या त्या तीव्र भावनेची शक्ति कमी पडली. पाय थकले. संकल्पशक्तीने पाय काही वेळ चालत होते. परंतु पोटात अन्न नाही. पाऊल कसे उचलले जाणार? बाहेर अंधार पडला. किती लांब आहे अजून गाव? तिला काही कल्पना नव्हती.

 रायगावातील लोक आता झोपले होते. दिवे विझून गेले होते आणि गार गार वारा सुटला होता. अंगाला झोंबणारा वारा. कडाक्याची थंडी. अशी थंडी कधी पडली नव्हती. मनूबाबा जागा होता. त्याने दार उघडे ठेवले होते. तो पुनःपुन्हा दाराशी येई व आपले सोने परत आले का पाही. दारात तो उभा राही व शून्य दृष्टीने दूरवर बघे. मग तो गार वारा अंगाला लागला म्हणजे तो पुन्हा खुर्चीत येऊन पडे. परंतु त्याला झोप येत नव्हती. त्याच्या पणत्या विझून गेल्या. फक्त एक पणती अद्याप तेवत होती. मनूबाबाने आत दार लावून झोपायचे ठरविले. तो दाराजवळ गेला. परंतु दार लावण्याचे विसरला. पुन्हा विचारात मग्न झाला. शेवटी तो अंथरूणात येऊन पडला. परंतु थंडी लागत होती. त्याच्या घरात भरपूर पांघरूण नव्हते. तो उठला. त्याने लाकडे पेटविली. त्यांच्याशी तो शेकत बसला. विस्तव सोन्याप्रमाणे चमकत होते. हे आपले सोने, असे

                           सोने परत आले*२७