हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनूबाबाला वाटले व तो त्या निखाऱ्यांस हात लावणार होता. पुन्हा त्याला भान आले.

 मनूबाबा अशा मनःस्थितीत असताना त्याच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर निराळा प्रकार होत होता. ती तरूणी अगदी गळून गेली. तिची सर्व आशा मेली. आता फक्त स्वतः ती मरायची उरली होती. तिच्याजवळ एक कुपी होती. त्या कुपीतील काही तरी ती प्यायली. मातृप्रेम म्हणत होते, "पिऊ नको." निराशा म्हणे, "पी. जगण्यात अर्थ नाही." ते काही तरी पिण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला एकदा शेवटचे पाजले. तिने त्याचे मुके घेतले. नंतर त्या बाळाला तिने आपल्या फाटक्या लुगड्याच पदर फाडून त्यात गुंडाळले. त्याला थंडी लागू नये म्हणून तिने मरता मरता काळजी घेतली. नंतर त्या मुलाला दोन्ही हातांनी घट्ट धरून ती चालत होती. हळूहळू त्या पेयाचा पूर्ण परिणाम झाला. किती वेळ चालणार? आता एक पायही उचलेना. शेवटी ती तेथेच मुलाला घट्ट धरून निजली. भू-मातेच्या मांडीवर निजली. शरीरातील ऊब जात चालली, प्रेम जात चालले. मुलाला घट्ट धरून ठेवणारे ते तिचे हात आता अलग झाले. मुलाकडे प्रेमाने पाहाणारे ते डोळे हळूहळू पूर्णपणे मिटले. कायमचे मिटले! ती माता गतप्राण होऊन पडली. अरेरे!

 ते मूल जागे झाले. मा मा मा मा करू लागले. आईचे हात पाहू लागले. त्या हातांनी स्वतःला पुन्हा घट्ट धरून ठेवावे असे त्या मुलाला वाटत होते. परंतु ते हात दूर झाले होते. कायमचे दूर झाले होते. इतक्यात त्या मुलाचे लक्ष समोरच्या झोपडीतून आलेल्या प्रकाशाकडे गेले. ते मूल रांगू लागले. प्रकाशाकडे येऊ लागले. झोपडीचे दार लावलेले नव्हते. त्या दारातून ते मूल आत आले. ते चुलीजवळ आले. गारठलेल्या त्या मुलाला ऊब मिळाली. मनूबाबा आपल्याच तंद्रीत होता. इतक्यात त्याचे लक्ष त्या मुलाकडे गेले. सोन्यासारखे मूल. तो पाहू लागला. सोने आले असे त्याला वाटले. त्याने ते मूल एकदम उचलले. ते 'मा मा मा मा' करू लागले. बोलणारे सोने, जिवंत सोने त्याला मिळाले! तो त्या लहान मुलाला घेऊन नाचवू लागला. त्याने त्या लेकराला धरून ठेवले. जणू पुन्हा कोणी घेऊन जाईल. ते मूल त्याच्याशी खेळू लागले. तो त्या मुलाच्या केसांवरून प्रेमाने

२८ * मनूबाबा