हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "असं चालेल का?"

 "न चालायला काय झालं? परंतु मी तुला आवडत असेन तर."

 "तू नाही आवडत तर कोण? तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू चांगला आहेस. खरंच मला तू आवडतोस."

 "आणि मला तू आवडतेस."

 "मी बाबांना विचारीन. ते काय म्हणतात पाहू."

 "विचार. त्यांचा आनंद तोच आपला."

 रामू व सोनी निघून गेली. रामू कामाला गेला. सोनी घरी आली. त्या दिवशी सायंकाळी मनूबाबा सोनीचा हात धरून फिरायला गेले होते. सूर्य अस्तास जात होता. पश्चिमेकडे किती सुंदर रंग पसरले होते आणि सोनीच्या तोंडावरही शतरंग नाचत होते.

 "सोन्ये, किती सुंदर दिसतं आहे तुझं तोंड!" मनूबाबा म्हणाले.

 "तुम्हांला मी नेहमीच सुंदर दिसते!" ती म्हणाली.

 "मलाच नाही. सर्वांना तू सुंदर दिसतेस. परंतु तुझं सौंदर्य कोणाच्या पदरी घालायचं? सोन्ये, तू आता मोठी झालीस. तुझं लग्न केलं पाहिजे. मी आता म्हातारा झालो. तुझे हात योग्य अशा तरूणाच्या हाती दिले, म्हणजे माझं कर्तव्य संपले."

 "बाबा!"

 "काय सोन्ये!"

 "तुम्हांला एक विचारू?"

 "विचार बेटा."

 "रामू मला विचारीत होता."

 "काय विचारीत होता?"

 "तू माझी बायको होशील का म्हणून."

 "तू काय म्हणालीस?"

 "म्हटलं की बाबांना विचारीन."

 "तुम्ही दोघांनी ठरवून टाकलंत एकंदरीत. माझी चिंता कमी केलीत."

 "बाबा, रामू चांगला आहे. तुम्हांला नाही तो आवडत?"

सोनी * ४५