मनूचे जीवन केवळ यांत्रिक झाले होते. दिवसभर तो खटक खटक मागाचा आवाज त्याच्या कानांत भरत असे, आणि रात्री त्या नाण्यांचा आवाज. तिसरा आवाज त्याला माहीत नव्हता. त्याचे डोळे विचित्र दिसत. ना त्या डोळ्यांत कोणताही भाव. ते डोळे यांत्रिक झाले होते. त्या डोळ्यांचे पाहाणे अर्थहीन झाले होते. मनूची मुद्रा फिक्कट झाली होती. तोंडावर ना तेज ना प्रसन्नता. मनू एखाद्या भुतासारखा भासे. गावातील लोकांना त्यची भीती वाटे. तरीही त्याच्याकडे कधी कधी बायका आपली मुले घेऊन येत. मुलांचे रोग कसे बरे करावे ते मनूला माहीत होते. त्याला अनेक औषधे माहीत होती. तो साधी साधी औषधे सांगे. झाडांचे पाले, वनस्पतीची मुळे हीच त्याची औषधे, परंतु मुलांचे रोग बरे होत. बायका त्याला धन्यवाद देत. जरी असे धन्यवाद मिळत असले तरी एक प्रकारची मनूबद्दलची भीतीही बायकांना वाटे. कोणी म्हणत, "मनूला भूतविद्या येते. पिशाच्चं त्याल वश आहेत, म्हणून त्याला रोग बरे करता येतात. नाही तर या बावळटाला कोठली येणार वैद्यकी?". कोणी म्हणत, "मनू आघांतरी चालतो. शरीरातून आपला प्राण वाटेल तिथं नेतो. पुन्हा शरीरात येतो. त्याला योगविद्या येते." असे नाना तर्कवितर्क याच्याविषयी चालत.
मुले त्याच्या झोपडीत डोकावत व म्हणत, "ते पाहा भूत बसलं आहे. मागावर बसून विणीत आहे. कसा म्हातारा दिसतो नाही?" कोणी त्याल 'ए म्हातारड्या मनू' अशी हाक मारीत. मनू त्यांच्याकडे बघे. मुले पळून जात.
मनूबद्दल जरी भीती वाटत असली. तरी हा निरुपद्रवी मनुष्य आहे अशी सर्वांची खात्री झाली होती. पंधरा वर्षांत त्याचे कोणाजवळ भांडण नाही, कधी तंटा नाही. विणाईच्या मजुरीविषयी घासधास नाही. जे लोक देत ते तो घेई. लोकांना त्याची करुणा वाटे. एकटा जीव. कोणी सखा ना मित्र. मूल ना बाळ. कसा राहात असेल विचारा, असे सर्वांना वाटे.
मनूच्य साऱ्या भावना गोठून गेल्या होत्या. त्याचे सारे प्रेम, त्याचा सारा लोभ, त्या सुवर्णमुद्रांत साठवला होता. आईबाप आपल्या मुलांना