पान:मराठी रंगभुमी.djvu/२९१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५७
भाग ३ रा.


करुं लागल्या आहेत ? कै. किर्लोस्कर, कै. केमकर किंवा रा. देवल यांच्या पयांत जो प्रसाद दिसून येतो, तो हृल्लींच्या एका तरी कवीच्या काव्यांत दिसून येतो काय ? शाकुंतल, सौभद्र व मृच्छकटिक ही नाटकें तर राहोतच, पण अगदी अलीकडच्या दुय्यम प्रतीच्या शारदा नाटकाची तरी बरोबरी करणरें एखादें नाटक हल्लीं निपजलें आहे काय ? आतांच्या ‘ऊठ बैस ऊठ भैस '; मी इचा पती या जगीं असे ’; ‘बस्स करी त्वरित मुख्य बंद :‘ येन केन प्रकारेण असल्या पद्यांत प्रसाद नाहीं एवढेंच नव्हे तर, ती अगदी ग्राम्य आहेत; व त्यांची केवळ तमाशाच्या धर्तीवर उठावणी करून नाटकमंडळ्यांनी लोकाभिरुचि बिघडून टाकली आहेसंविधानक चांगले ठेवणे व पात्रांचे स्वभाव उत्तम रेखाटणे यासंबंधानेही अलीकडील नाटकें कमी दर्जाचीं आहेत, एवढंच नव्हे तर, ‘सत्यविजय’ , ' प्रेमदर्शन, ', 'प्रेमबंधन' 'गुप्तमंजूष ', ‘ चंद्रहास, ' वगैरे नाटकांतील संविधानक उच्च प्रतीचें नसून यांत अनुकरणीय सद्गुण वास करीत असल्याचे पात्र क्वचित् आढळून येते. अशा प्रकारच्या नाटकांत तमाशापेक्षां थोडा संभावित श्रृंगार व विनोद आहे एवढेंच. बाकी नाटकापासून काय बोध घ्यावा हे व्यक्त नसून त्याचा ठसाही प्रेक्षकांच्या मनांवर राहात नाही. सुबोधपणा हा एक सरसनाटकचा गुण आहे, व तोही गुप्तमंजुषासारख्या नाटकामध्ये दिसून येत नाही. प्रसंगासंबंधानेंही अलीकडील नाटकांत अनेक दोष आहेत. भोजन, निद्रा, स्नान, विवाहविधी, मृत्यू, वगैरे कांही प्रसंग नाटकांत घालूं नयेत असें नाट्यशास्त्रज्ञांचे मत आहे. पण या मतास झुगारून देऊन हे प्रसंग अलीकडे नाटकांतून दिवसेंदिवस अधिकाधिक येऊं लागले आहेत. एवढेच नव्हे तर, शौचमुखमार्जनादि प्रातर्विधींसारखे अश्लील, गण व किळसवाणे विधीसुद्धां अभिनयासह करून दाखविण्यांत नाटकमंडळीस भूषण वाटलें व लोकही त्यास प्रोत्साहन देतात ! लोकाभिरुचीस वाईट वळण लावल्याबद्दल जर कोणास जबाबदार धरावयाचे असेल तर तें वरील प्रकार करणाऱ्या नाटकमंडळ्यांसच धरलं पाहिजे. समाजनीतीच्या