दृष्टीनें त्यांत खरोखर रम्य व स्पृहणीय असे भाग विरळ आहेत.यांतही संगीत नाटकांची रेलचेल आहे.यांतील कित्येक संगीत नाटकें नीतिदृष्ट्या विगीत आहेत, असें मोठ्या खेदानें म्हणणें भाग आहे. संगीत नाटकांत श्रृंगार हा प्रधान रस असून त्यांत प्राचीन नाट्याचार्यांच्या किंवा प्राचीन नाटकग्रंथ रचणाऱ्यांच्या किंवा अर्वाचिन विदग्ध,सहृदय व सदभिरुचिज्ञ पंडितांच्या मान्यतेस पात्र अशा प्रकारच्या श्रृंगाराचा परिपोष नसून केवळ टवाळपणा मात्र दृष्टीस पडतो. चांगल्या मार्मिक लेखकांच्या प्रबंधांत शृंगाराचा ध्वनि मात्र असतो. परंतु अलीकडील कांहीं संगीत नाटकांत त्याची उत्तान अशी व्यंजना असते, म्हणजे केवळ ग्राम्यधर्मवाचक शब्दांचा प्रयोग करणें हेंच केवळ लोक रुचीस प्रिय करण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार नीतिदृष्ट्या अत्यंत गर्हणीय असून राष्ट्राच्या अभ्युदयास विघातक आहे. कोणत्याशा अलीकडील एका नाटकांत "हं मदंगा लावुं नका" अशी नायिकेची नायकास उक्ति आहे, व ती पुष्कळ अल्पवयी मुलाबाळांच्या तोंडीं बसली आहे. आतां अशा अर्थाच्या नायिकेच्या उक्तीस अनुरूप अभिनय कसा होत असेल, व अल्पवयी मुलगे आणि मुली ह्यांच्या हृदयांवर अशा उक्तीचा व अशा अभिनयाचा परिणाम काय होत असेल, याची कल्पना करणें मी श्रोत्यांकडेसच सोपवितों. केवळ शुद्ध संगीतकला फार रमणीय आहे. तिचा संस्कार मनावर फार हितावह होतो. मनाची प्रसन्नता आणि तादात्म्य प्राप्त करून घेण्याचे संगीत हें एक उत्तम साधन आहे. आणि म्हणूनच भजनांत व हरिकीर्तनांत गायनाची योजना आपले पूर्वजांनीं केली आहे, किंबहुना साम वेद हा गाण्याचा वेद आहे, व “ गायन्ति त्वा गायत्रिणो "अशीं वचनें वेदांत आहेत. यावरून गायनकला फार प्राचीन कालापासून आपल्या लोकांत मोठ्या योग्यतेची मानलेली आहे.ही सर्व गोष्ट खरी आहे. परंतु मन वश करून घेण्याचें जें या कलेंत सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचा सदुपयोग न केला तर परिणाम वाईट होईल, हें उघड आहे. दुधाला अमृताची उपमा
पान:मराठी रंगभुमी.djvu/२९४
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६०
मराठी रंगभूमि.