पान:मराठी रंगभुमी.djvu/11

हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना.

 समाजांतील जोम, नीतिमत्ता व ज्ञानाविषयीं लालसा ही मापण्याची जी काही साधने आहेत त्यांत करमणुकी हे एक साधन आहे. करमणुकी ज्या मानाने उच्च प्रतीच्या किंवा कमी दर्जाच्या असतील त्या मानानें कोणताही समाज सुधारणेच्या प्रगतीस लागलेला असतो किंवा त्याची पिछेहाट होत चाललेली असते. सामाजिक करमणुकीत नाटकाची करमणूक अत्यंत महत्वाची असून त्या करमणुकीवरून समाजाच्या एकंदर हालचालीच्या नाड्या कशा रीतीने वाहत आहेत याचा अंदाज करितां येतो. हल्ली महाराष्ट्रांत नाटककंपन्या अनेक झाल्या असून लोकांची नाटक पाहण्याकडेही बरीच प्रवृत्ति झाली आहे. त्यामुळे दरमहा शें पांचशे रुपये मिळविणारा सरकारी नोकर असो किंवा स्वतंत्र उद्योगावर दहा पांच रुपये पोटाला मिळविणारा साधारण गरीब मनुष्य असो, वर्षाच्या काठी त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्राप्तीचा थोडाबहुत भाग तरी नाटकाकडे जातोच. एवढेच नव्हे तर, शहरांतील कित्येक लोकांना नाटकाची एक प्रकारची चटक लागल्यामुळे आयाच्या मानाने या कामाकडे त्यांचा जास्त पैसा खर्च होत असतो. हा जो पैसा खर्च होतो त्या मानाने लोकांना मोबदला मिळतो किंवा नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे व या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर हल्लीच्या मराठी रंगभूमीच्या स्थितीवरून कोणास देता येईल असे मला वाटत नाही. नाटकमंडळ्यांना द्रव्य मिळविण्याची लालूच लागल्यामुळे असो, किंवा विद्वान व सुशिक्षित लोकांच्या हल-