पान:मराठी रंगभुमी.djvu/157

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३९
भाग २ रा.


कथा हृदयंगम असल्यामुळे व बाणभट्टाचे अलंकार, प्रौढ भाषा, कल्पनाविशालत्व इत्यादिकांवर रा. देवल यांस हात टेंकण्यास जागा झाल्यामुळे त्यांनीं नाटकास बरीच शोभा आणली आहे. शिवाय त्यांची कविताही चांगली असल्यामुळे तिकडूनही या शोभेंत भर पडली आहे. या नाटकांत भाऊराव हे पुंडरीकाचें काम करीत असून रा. गुरव हे महाश्वतेचें करीत असत; व हीं दोन्ही कामें प्रेक्षणीय होत असत. या नाटकांतील बहुतेक पद्यांच्या चाली जुन्या असून या वेळपर्यंत किर्लोस्कर कंपनीनें आपली पूर्वीची पद्धतही सोडली नव्हती. यापुढें मात्र तिच्या पद्धतींत फरक पडत चालला व ' शारदा ' आणि ' वीरतनय ' नाटकापासून तो विशेष रीतीनें व्यक्त होत चालला.
 शारदा हें सामाजिक विषयावरील नाटक असून तें रा. देवल यांनीं रचलें आहे. यापूर्वी ' संगीत सौभाग्यरमा ' नांवाचें एक सामाजिक विषयावर नाटक झालें असून त्याचे प्रयोग मुंबईस रा. आण्णा मार्तड जोशी यांच्या कंपनीनें केले हेोते. या नाटकाचा उद्देश " लोकांचे मनावर विधवांचे दीन व अतिकरुण स्थितीचें स्वरूप वटवून देऊन ज्या आमच्या ज्ञातिवर्गात स्त्रीपुनर्विवाह होत नाहीं त्यामध्यें स्त्रीपुनर्विवाहाचा प्रचार सुरू करण्याची अत्यंत अवश्यकता आहे असें त्यांचे मनावर ठसवावें हा आहे; व " कै. विष्णुशास्त्री