पान:मराठी रंगभुमी.djvu/211

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७७
भाग ३ रा.


कंपन्यांचे खेळ सारखे सुरू असतात. निरनिराळ्या रसांचा व मनोविकारांचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर उठवावयाचा आहे तर त्याला बुकिश नाटकेंच योग्य आहेत. पण बुकिश नाटकांकडे लोकांची प्रवृति कमी होत चालल्यामुळे नाटकांचा हा हेतु मुळींच सिद्धीस जात नाहीं असें ह्मणावें लागतें. संगीत नाटकांत गाण्यावर विशेष भिस्त असल्यामुळे गाणारीं कांहीं पात्रें असलीं ह्मणजे झालें, बाकी भाषणें किंवा अभिनय यांकड़े यथातथाच लक्ष दिलें जातें. बुकिश नाटकांत असें चालत नाहीं. त्यांत नायकापासून चाकरापर्यंत सर्वांनीं आपापल्या भूमिकेबद्दल फार काळजी घेतली पाहिजे: व हलक्या सलक्या कामांत चूक झाली तरी त्यापासून एकंदर नाटकास कमीपणा येतो. दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रसार जास्त होत असून नाट्यकलेच्या या आंगास कां रोग जडावा हें आह्मांस समजत नाही. हा सुशिक्षित लोकांचा हलगर्जीपणा आहे असें आह्मांस वाटतें व तो दूर करून यापुढे ते या कामाकडे विशेष लक्ष पुरवितील अशी आशा आहे. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजांत मागें मराठी नाटकें होत होती; पण त्या कॉलेजानेंही हीं नाटकें करण्याचा आपला संप्रदाय अलीकडे सोडून दिला आहे. पण त्यायोगानें नाट्यकला ऊर्जितावस्थेत आणण्याचा एक यत्न कमी होऊन नवीन नवीन नाटकें जीं होत होतीं त्यांसही